पतीच्या निधनानंतर महिलेच्या घरात बसवले CCTV, त्यानंतर घडला असा प्रकार; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 12:49 IST2022-01-23T12:47:55+5:302022-01-23T12:49:01+5:30
पीडित ५९ वर्षीय महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. २२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पतीच्या निधनानंतर महिलेच्या घरात बसवले CCTV, त्यानंतर घडला असा प्रकार; पिंपरीतील घटना
पिंपरी: पतीच्या निधनानंतर महिलेवर नजर ठेवण्यासाठी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेचा ५८ वर्षीय दीर व ९२ वर्षीय सासरा यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुनी सांगवी येथे २७ ऑक्टोबर २०२१ ते २२ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
पीडित ५९ वर्षीय महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. २२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीच्या निधनानंतर, काही दिवसातच आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीच्या २९ वर्षीय मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच भररस्त्यात शिवीगाळ केली. फिर्यादीवर २४ तास नजर ठेवण्यासाठी फिर्यादी राहात असलेल्या घराच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्याद्वारे फिर्यादी घरामध्ये उठताना बसतानाचे चित्रीकरण दोन्ही आरोपींनी सीसीटीव्हीद्वारे बघितले.
आरोपी दिराने फिर्यादीच्या मुलीच्य बाबत अश्लील शेरेबाजी केली. तुझी तर सेटिंगच लावतो आणि तुम्ही दोघेही आयत्यावर बसले आहात इथून निघून जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या मुलीला मारहाण व शिवीगाळ केली. तुला कसा बघतो ते बघ, असे म्हणून धमकीही दिली. तसेच अश्लील बोलून मनास लज्जा निर्माण करून फिर्यादीचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.