Video : कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 09:05 PM2019-06-18T21:05:42+5:302019-06-18T21:09:44+5:30

बॉम्ब सदृश्य सिमेंट ब्लॉकचा घडवला स्फोट

CCTV footage of suspected accused who carried bomb material in Kalamboli | Video : कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद  

Video : कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद  

googlenewsNext
ठळक मुद्देनवी मुंबई गुन्हे शाखेसह मुंबई एटीएसचे पथक या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दुपारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासोबत गोपनीय बैठक घेतली.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा सोमवारी मध्यरात्री रोडपाली परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळेसमोर बॉम्बसदृष्य वस्तू ठेवणाऱ्याचे व्हिडीओ चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. या चित्रीकरणावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेसह मुंबई एटीएसचे पथक या गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

कळंबोली सेक्टर 1 येथील सुधागड एज्युकेशनच्या शाळेबाहेरील रस्त्यावर सोमवारी दुपारी बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. हातगाडीवर ठेवलेल्या खोक्यामध्ये घडय़ाळाला वायरी जोडून त्या दुसऱ्या एका बॉक्सला जोडलेल्या होत्या. याची माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणीअंती या वस्तू वेगवेगळ्या केल्या आहेत. त्यामध्ये  घडय़ाळाला जोडलेल्या चार वायर ज्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये अडकवण्यात आल्या होत्या, तर त्याच्या बाजूलाच एका छोटय़ा पेटीमध्ये खिळे व इतर धारदार धातू ठेवण्यात आलेले होते. शिवाय विद्युत प्रवाहासाठी १२ व्होल्टची बॅटरी वापरण्यात आली होती.  स्फोट घडवण्यासाठी घडय़ाळातील बॅटरीही पुरेशी असताना, त्याला १२ व्होल्टेजची  बॅटरी का जोडण्यात आली? असा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे. अखेर त्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रोडपाली लगतच्या एकांताच्या ठिकाणी पोलिसांनी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास स्फोटके वापरून हा सिमेंटचा ब्लॉक फोडला. त्यानंतर सकाळी बीडीडीएसच्या पथकाने त्या सिमेंटच्या ब्लॉकचे तुकडे एकत्र करून ते फॉरन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. सिमेंटमध्ये कोणत्या स्फोटकाचा वापर झालेला होता का ? याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालातून होणार आहे; परंतु हा सिमेंटचा ब्लॉक फोडण्यासाठी करण्यात आलेल्या स्फोटाच्या आवाजामुळे शाळेबाहेर सापडलेल्या त्या बॉम्बसदृश वस्तूचाच स्फोट झाल्याच्या अफवा परिसरात पसरल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी दुपारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासोबत गोपनीय बैठक घेतली.
पोलिसांच्या तपासात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टोपी घातलेल्या एका व्यक्तीने ती हातगाडी त्या ठिकाणी ठेवल्याचे समोर आले. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याद्वारे सदर व्यक्तीचा शोध सुरू आहे. चित्रीकरणामध्ये संबंधीत आरोपीने डोक्यावर टोपी घातली आहे. स्वत:चा चेहरा कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची काळजी त्याने घेतली आहे. पोलिसांनी  सदर व्यक्ती ज्या रोडने गेली त्या रोडवरील सर्व कॅमेऱ्यांची सीसीटिव्ही तपासण्यास सुरवात केली असून लवकरच आरोपी हाती लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 

Web Title: CCTV footage of suspected accused who carried bomb material in Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.