CBI Bike Boat Scam: धक्कादायक! सीबीआयने उघडकीस आणला 15 हजार कोटींचा महाघोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 06:13 IST2021-11-03T06:12:42+5:302021-11-03T06:13:00+5:30
‘बाईक बॉट’ प्रकरणात २ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक

CBI Bike Boat Scam: धक्कादायक! सीबीआयने उघडकीस आणला 15 हजार कोटींचा महाघोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा सीबीआयने उत्तर प्रदेशात उघडकीस आणला आहे. मोटारसायकल (बाईक) टॅक्सी सेवेच्या नावाखाली गुंतवणूक योजना राबवून देशभरातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना १५ हजार कोटी रुपयांना फसविण्यात आले असून ‘बाईक बॉट’ नावाने हा घोटाळा आता गाजू लागला आहे.
गर्वित इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. (जीआयपीएल) या कंपनीचा प्रवर्तक संजय भाटी आणि इतर १४ जणांवर सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी ईडीनेही चौकशी केली असून २१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
संजय भाटी हा बाईक बॉट कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहे. कंपनीच्या जाहिरातीनुसार, या योजनेत गुंतवणूकदार एक, तीन, पाच अथवा सात बाईकमध्ये गुंतवणूक करू शकत होते. कंपनी या बाईक भाड्याने देऊन गुंतवणूकदारास मासिक भाडे, ईएमआय आणि अधिक बाईक असल्यास बोनस देणार होती. गुंतवणूकदाराने साखळी पद्धतीने इतर गुंतवणूकदार आणल्यास त्यावर प्रोत्साहन लाभ दिला जाणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू झालेली २०१९ पर्यंत सुरू होती.
देशभरामधून आल्या तक्रारी
लोकांनी योजनेत गुंतवणूक केली, पण कंपनीने त्यांना परतावा दिलाच नाही. लोकांच्या मूळ रकमाही कंपनीकडे अडकून पडल्या. असंख्य तक्रारी देशभरातून यायला लागल्यानंतर प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थांकडे देण्यात आला. ‘बाईक बॉट’ घोटाळ्यात सुमारे २ लाख गुंतवणूकदारांना गंडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.