मजुराकडून लाच घेताना वेकोलिच्या व्यवस्थापकाला सीबीआयकडून अटक
By योगेश पांडे | Updated: October 14, 2022 22:29 IST2022-10-14T22:28:20+5:302022-10-14T22:29:12+5:30
कोळसा मंत्री विदर्भात असताना कारवाई, सुटीच्या दिवशी केलेल्या कामाच्या मजुरीच्या बदली मागितली लाच

मजुराकडून लाच घेताना वेकोलिच्या व्यवस्थापकाला सीबीआयकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: साप्ताहिक सुटीच्या दिवशी केलेल्या कामाच्या मजुरीच्या बदल्यात चक्क एका मजुराला पाच हजारांची लाच मागणाऱ्या वेकोलिच्या व्यवस्थापकाला सीबीआयकडून रंगेहाथ पकडण्यात आले. चंद्रपूर येथील दुर्गापुर खाण परिसरात ही कारवाई झाली. दिनेश कुमार कराडे असे व्यवस्थापकाचे नाव आहे. विशेष म्हणजे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी विदर्भात असतानाच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली होती.
संबंधित मजुर हा दुर्गापूर खाण परिसरात कार्यरत आहे. साप्ताहिक सुटी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी काम केल्यावर त्याला दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळतात. सामान्य मजुरांच्या या ड्युट्या लावण्याची जबाबदारी कराडेकडे होती. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तक्रारकर्त्याला ९ सुट्यांच्या दिवशी ड्युटी मिळाली. या कामाच्या बदल्यात दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळणार होते.
त्याच्या मंजुरीसाठी कराडेने मजुराला पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची चाचपणी केली. सीबीआयच्या ‘एसीबी’च्या पथकाने दुर्गापूर येथे सापळा रचला व लाच घेताना कराडेला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वेकोलिमध्ये खळबळ माजली आहे.