'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:10 IST2025-12-14T13:10:03+5:302025-12-14T13:10:18+5:30
Digital Arrest Fraud Ahmedabad : अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिक महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. सायबर गुन्हेगारांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या बँक खात्याचा वापर बेकायदेशीर कामांसाठी होत आहे आणि त्यांच्याविरुद्ध 'डिजिटल अरेस्ट वॉरंट' जारी करण्यात आले आहे.

'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
गेल्या काही काळापासून देशभरात सायबर गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट' नावाच्या एका नवीन फसवणुकीच्या जाळ्यात ओढत आहेत. अहमदाबादमध्येही एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला या फसवणुकीतून वाचवण्यात यश आले आहे. बँक मॅनेजरच्या वेळेवर आणि योग्य सतर्कतेमुळे त्या नागरिकाचे लाखो रुपये वाचले.
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिक महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. सायबर गुन्हेगारांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या बँक खात्याचा वापर बेकायदेशीर कामांसाठी होत आहे आणि त्यांच्याविरुद्ध 'डिजिटल अरेस्ट वॉरंट' जारी करण्यात आले आहे. त्यांना फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्यास भाग पाडले गेले, अन्यथा त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली.
या भीतीमुळे महिलेने एका बंद खोलीत स्वतःला कोंडून घेतले आणि त्यांनी सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू केली. बँकेत ती आरटीजीएस करण्यासाठी गेली होती. याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांच्या बँकेतील मॅनेजरने त्यांच्या खात्यातून होणाऱ्या मोठ्या आणि संशयास्पद ट्रान्सफरची नोंद घेतली. या ज्येष्ठ नागरिकाचे वर्तन असामान्य वाटत असल्याने आणि बँक मॅनेजरला 'डिजिटल अरेस्ट' फसवणुकीबद्दल माहिती असल्याने, त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ज्येष्ठ नागरिकाशी संवाद साधून त्यांची फसवणूक होत असल्याचे समजावून सांगितले. यामुळे वेळेत ट्रान्सफर प्रक्रिया थांबवण्यात आली आणि त्यांचे ३३.३५ लाख रुपये वाचले.
'डिजिटल अरेस्ट' म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट ही फसवणुकीची एक पद्धत आहे, ज्यात सायबर गुन्हेगार बनावट पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी किंवा कस्टम्स अधिकारी म्हणून फोन करतात. ते पीडित व्यक्तीला सांगतात की, 'तुमच्या नावाने गैरकृत्ये झाली आहेत, त्यामुळे तुम्हाला अटक वॉरंट जारी झाले आहे.' या भीतीने पीडित व्यक्तीला मोबाईलवरून व्हिडीओ कॉलद्वारे एका बंद खोलीत बसण्यास सांगितले जाते आणि पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.