विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 07:32 IST2026-04-06T07:31:46+5:302026-04-06T07:32:21+5:30
मुंबई, ठाण्यात एटीएस, दिल्ली पोलिसांची शोध मोहीम; दहशतवादी कारवायांचा संशय; दोघे ताब्यात

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेली चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून तब्बल ६५० कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध रोकड, अमली पदार्थ व मद्य जप्त करण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक जप्ती एकट्या पश्चिम बंगालमधून केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार होती, असा दावा या जप्तीसंदर्भात माहिती देताना निवडणूक आयोगाने केला.
पश्चिम बंगालमधून ३१९ कोटींची अवैध रोकड, अमली पदार्थ, दारू व मौल्यवान धातू जप्त करण्यात आले. त्या खालोखाल तामिळनाडूमध्ये १७० कोटी जप्त करण्यात आले. उर्वरित १६१ कोटी रुपयांची अवैध रोकड विधानसभा निवडणूक होत असलेल्या केरळ, आसाम व पुद्दुच्चेरी येथून जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या तक्रारींवर १०० मिनिटांच्या आत कारवाई निश्चित करण्यासाठी चार राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी ५,१७३ हून अधिक भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबई, ठाण्यात छापेमारी करत दोन संशयित तरुणांना बेड्या ठोकल्या. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा नोंदवत पुढील तपासासाठी दोघांना दिल्लीत नेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी ही संयुक्त कारवाई करण्यात आल्याचे एटीएस सूत्रांकडून समजते.
हे तरुण एका दहशतवादी संघटनेच्या ओडिशा मॉड्यूलचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. ऑनलाइन साहित्याद्वारे तरुणांमध्ये ‘जिहादी’ विचाराद्वारे माथी भडकावत होते. तसेच या दोघांनी अन्य साथीदारांसोबत घातपाती कृत्याचा कट आखला होता. अटक आरोपींमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.