सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दाम्पत्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 20:51 IST2021-03-31T20:51:05+5:302021-03-31T20:51:38+5:30
Crime News : गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदलला म्हणून त्या दाम्पत्याने सरकारी कामात अडथळा आणत गोंधळ घातला.

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दाम्पत्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मीरारोड - भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन धुडगूस घालत धमक्या देणाऱ्या एका दाम्पत्या विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदलला म्हणून त्या दाम्पत्याने सरकारी कामात अडथळा आणत गोंधळ घातला. (A case has been registered at Bhayander police station against the couple for obstructing government work)
भाईंदर पश्चिमेला असलेल्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यायात मीरारोडच्या जांगीड कॉम्प्लेक्स मधील गंगोत्री गृहनिर्माण संस्थेतील भावना मंडोरा व त्यांचे पती राजेश मंडोरा सायंकाळी पाचच्या सुमारास गेले. कार्यालयातील उपनिबंधक सतीश देवकते यांच्या दालनात ते दाम्पत्य शिरले. तेथे जाऊन त्यांनी, आमचे सोसायटीचे प्राधिकृत प्रशासक अधिकारी श्रद्धा संदीप कदम यांच्या ऐवजी अलिहैदर शेख यांची नियुक्ती का केली ? अशी विचारणा करून देवकते यांच्याशी वाद सुरु केला.
आरडाओरडा करून भावना व राजेश यांनी जोपर्यंत तुम्ही शेख यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही असे धमकावत देवकते यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून अडवले. कार्यालयातील कामात अडथळा आणला. कार्यालयातील कागदपत्रे जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी भावना व राजेश मंडोरा यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.