अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल, महात्मा गांधी यांचा केला अवमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:07 IST2021-12-27T13:59:17+5:302021-12-27T14:07:47+5:30
FIR against religious leader Kalicharan Maharaj : रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात FIR दाखल, महात्मा गांधी यांचा केला अवमान
रायपूर - छत्तीसगडची राजधानी रायपुर येथे आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज याने महात्मा गांधीविषयी अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, महाराष्ट्रातील अकोला येथून येथे आलेल्या कालीचरण महाराज याने महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या भाषणात समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या विधानांचाही समावेश होता.
काय म्हणाले कालीचरण महाराज?
महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजाने अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे. कालीचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं आहे.
रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली.