कार कंपनी CEO च्या अपहरणाचा थरार, माजी कर्मचाऱ्यानं रचला कट; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: March 20, 2025 20:11 IST2025-03-20T20:10:55+5:302025-03-20T20:11:21+5:30

शरीफ खान हे बडनेरा मार्गावरील कंपनीच्या कार सर्व्हिस सेंटरसमोर कारने आले. त्यावेळी त्यांच्या कारचा चालकसुध्दा कारमध्ये होता.

Car company CEO kidnapped in Amravati, police arrest two | कार कंपनी CEO च्या अपहरणाचा थरार, माजी कर्मचाऱ्यानं रचला कट; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

कार कंपनी CEO च्या अपहरणाचा थरार, माजी कर्मचाऱ्यानं रचला कट; पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

अमरावती - बडनेरा मार्गावरील एका नामांकित कार कंपनीच्या सीईओचे चाकूच्या धाकावर अपहरण करण्यात आले. मात्र राजापेठ पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठले. तथा लोकेशननुसार अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. बडनेरात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे अपहृत सीईओची सुखरुप सुटका झाली.

अपहरणकर्त्यांमध्ये त्याच कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. २० मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हे फसलेले अपहरणनाट्य रंगले. राजापेठ पोलिसांच्या डीबीने ही यशस्वी कारवाई केली. मो. शरीफ खान मो. शहीद खान (५५, रा. रोज कॉलनी, नागपूर) असे ‘सीईओ’चे नाव आहे.             आनंद सुरेश ओगले (३०, रा. यशोदानगर) आणि अक्षय सुधीर खुळे (३१, रा. किरणनगर) असे अटक अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

मो. शरीफ खान हे बडनेरा मार्गावरील कंपनीच्या कार सर्व्हिस सेंटरसमोर कारने आले. त्यावेळी त्यांच्या कारचा चालकसुध्दा कारमध्ये होता. त्याचवेळी आनंद ओगले व अक्षय खुळे हे दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी चाकूचा धाक दाखवला तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. जबरीने त्याच कारमध्ये बसवले. त्यानंतर आनंद ओगलेने कार चालकाला बाजूच्या सीटवर बसण्यास सांगितले आणि स्वत: कारचे स्टेअरींग ताब्यात घेतले. याचवेळी खुळे हा मो. शरीफ यांना चाकू लावून मागे बसला, त्यानंतर त्यांनी काहीवेळ शहरात कार फिरवली.

ठाणेदारांनी घेतली दखल

ओगलेने सीईओला आम्हाला एटीएममधून पैसे काढून दे, असे सांगितले. त्यामुळे सीईओने त्यांना एका एटीएममधून पंधरा हजार रुपयेदेखील काढून दिले. त्यानंतर दारु घेवून मागितली. दुसरीकडे सीईओचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच कार कंपनीमधील काही कर्मचाऱ्यांनी तात्काळ राजापेठ ठाण्यात धाव घेतली. त्यांनी घडलेला प्रकार ठाणेदार पुनित कुलट यांना सांगितला. ठाणेदारांनी तत्काळ डिबी पथकाला अपहरणकर्त्यांचा पाठलाग करण्यास सांगितले.

बडनेऱ्यात पकडले

बडनेरातील चांदणी चौकाजवळ सीओची कार पोलिसांच्या नजरेत पडली. पोलिसांनी तत्काळ कार थांबवून अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले तसेच सीओंची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत त्यांना दुखापत झाली, त्यामुळे रुग्णालयात पाठवले. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आनंद ओगले आणि अक्षय खुळे या दोघांविरुध्द खंडणी व खुनाच्या ईराद्याने अपहरण करणे या कलमान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली आहे

Web Title: Car company CEO kidnapped in Amravati, police arrest two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.