उत्तर प्रदेशातील एका आयएएस अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्यांनी अमानुष वर्तन, शोषण आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपी वरिष्ठ आयएएस अधिकारी नोएडाच्या राज्य कर विभागात तैनात असून, सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी या संदर्भात तक्रार पत्र मिळाल्याची पुष्टी केली आहे. या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या महिला कर्मचाऱ्यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तक्रार पाठवली आहे. या तक्रार पत्रात महिला अधिकाऱ्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, अधिकारी त्यांना गुलामांसारखे वागवतात. अपशब्द वापरतात. जर, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत, तर नोकरीवरून काढून टाकण्याचा धमक्या देखील देत असल्याचे म्हटले आहे.
तक्रार करणाऱ्या एक महिलेने आपबिती सांगताना म्हटले की, या आयएएस अधिकाऱ्याचे हे त्रास देणे गेल्या ४ महिन्यांपासून सुरू आहे. जर मी त्यांचे ऐकले नाही, तर ते मला नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी देत आहेत. यासोबतच इतर काही महिला कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्याने लैंगिक छळ केल्याचे देखील आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
खोलीत बोलवतात अन्... महिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, हा आयएएस अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्याच्या खोलीत बोलवतो, त्यांना तासन् तास उभे करून ठेवतो. त्यांच्याशी अतिशय घाणेरडे बोलतो आणि वाईट नजरेने बघतो. रात्रीच्या व्हिडीओ कॉल करून त्रास देतो. इतकंच नाही तर, लपूनछपून महिलांचे व्हिडीओ बनवतो. या विरोधात तक्रार करायचा प्रयत्न केल्यास निलंबित करण्याची धमकी देतो.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या तक्रार पत्रात महिला कर्मचाऱ्यांनी लिहिले की, एकीकडे सरकार 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' सारख्या मोहिमांद्वारे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे एक वरिष्ठ आयएएस अधिकारी महिलांचे शोषण करत आहे. महिला कर्मचाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याची गंभीरता लक्षात घेऊन जलद चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.