व्यावसायिकाची गोळी घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:15 IST2020-06-05T05:15:14+5:302020-06-05T05:15:33+5:30

तळवळीतली घटना : व्यावसायिक वादातून हत्या झाल्याची शक्यता

Businessman shot dead | व्यावसायिकाची गोळी घालून हत्या

व्यावसायिकाची गोळी घालून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकाची गोळी घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी तळवली येथे घडली. यामध्ये आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडामागे व्यावसायिक वादाचे कारण समोर येत आहे. प्रवीण तायडे असे गोळी लागून मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
घणसोली सेक्टर २१ (तळवली) येथे त्याचे बांधकाम सुरू आहे. मुख्य व्यावसायिकांकडून काम घेऊन तो बांधकाम करण्याचे काम करायचा. बांधकामाची साईट मिळविण्यावरून त्याची आणि काही स्थानिक बांधकाम व्यावसायिकांत चढाओढ असायची. याच प्रकारातून घणसोली सेक्टर २१ मधीलच काही भूखंड विकसित करण्याचे काम मिळविण्यावरून तायडेचे काही जणांसोबत वाद सुरू होते. याच वादातून गुरुवारी त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण तायडे हा एका साथीदारासोबत दुचाकवीवरून चालला होता. या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. मारेकऱ्यांपैकी एकाने तायडेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी तायडेच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारालाही गोळी लागली असून तो जखमी अवस्थेत पडला असता हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरातील व्यक्तींनी पोलिसांना कळविले असता गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तपास पथकांसह घटनास्थळी भेट दिली.

संपर्कातील व्यक्तींकडे चौकशी
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. तर हत्येमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तायडेच्या संपर्कातील व्यक्तींकडेही पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: Businessman shot dead