14 कोटींच्या चुना लावणाऱ्या बंटी - बबलीला अटक; 403 ठेवीदारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:34 IST2018-11-28T13:32:56+5:302018-11-28T13:34:18+5:30
ते दोघेही पोलिसांना शरण आले. रामचंद्र चिल्वेरी आणि त्यांची पत्नी रुपा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

14 कोटींच्या चुना लावणाऱ्या बंटी - बबलीला अटक; 403 ठेवीदारांची फसवणूक
मुंबई - नागपाडा परिसरात गुंतवणूकीच्या नावाखाली 403 नागरीकांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) मंगळवारी दांपत्याला अटक केली. ते दोघेही पोलिसांना शरण आले. रामचंद्र चिल्वेरी आणि त्यांची पत्नी रुपा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फसवणूक झालेल्यांमध्ये रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती, महिला व वरिष्ठ नागरीकांचा समावेश आहे. नागपाडा परिसतील कामाठीपुरा येथील आठव्या गल्लीत रामचंद्र चिल्वेरी हा 2000 पासून रुपा चीटफंड नावाने ही भीशी सुरू होती. दर महिन्याच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे परिसरातील अनेकांनी या भीशीत पैसे गुंतवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून रामचंद्र गायब झाला. बरेच दिवस झाल्यानंतर परिसरातील नागरीकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार सर्वांनी एकत्र येऊन याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार १९ नोव्हेंबरला याप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्यक्षात हे प्रकरण खूप मोठे असून त्यात सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांचे 35 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी आणखी तक्रारदारही पुढे येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.