अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना शिकवला धडा; राहत्या घरावर चालवला बुलडोझर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:05 IST2023-07-29T16:52:31+5:302023-07-29T17:05:30+5:30
मैहर प्रशासनाने शनिवारी सकाळीच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची कारवाई केली.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील मैहरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानुसार आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आरोपी रवींद्र चौधरीचे उदयपूर येथील घर पाडण्यात आलं आहे, तर मालियन टोला येथील अतुल बढौलियाच्या घरावरही बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
मैहर प्रशासनाने शनिवारी सकाळीच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची कारवाई केली. कारवाईदरम्यान एसडीएम सुरेश जाधव, एसडीओपी लोकेश दावर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही आरोपींनी 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मुलीवर सध्या रीवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मंदिर व्यवस्थापनात रोजंदारीवर काम करतात. गुरुवारी दुपारी दोघांनी मुलीला फसवून शारदा मातेच्या मंदिराजवळील डोंगरावर नेलं. याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला मारहाणही करण्यात आली. त्यानंतर मुलीला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.
एसडीओपी लोकेश डावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीरावर अनेक खुणा आहेत. रवींद्र कुमार रवी आणि अतुल भदोलिया अशी आरोपींची नावे आहेत. दोघांचे वय 30 वर्षे आहे. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, तेथून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.