दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 23:19 IST2025-08-23T23:18:33+5:302025-08-23T23:19:12+5:30

मार्च महिन्यात तो १ महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. त्याचवेळी पॅरालाइसिस अटॅक आल्याने त्याने ५ महिने सुट्टी वाढवली होती. 

BSF jawan jumps into Ganga river while holding one and a half year old child | दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

बिजनौर - ३ वर्षापूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या बीएएसएफ जवानाचं कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरगुती वादातून पाच दिवसांपूर्वी जवानाच्या पत्नीने गंगा नदीत उडी घेतली. बरीच शोध मोहिम घेतल्यानंतरही तिचा थांगपत्ता लागला नाही. पत्नी सोडून गेल्यानं पतीच्या वाटेला विरह आला. त्यातच सासरच्यांनी त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. यातून नैराश्य आलेल्या जवानानं टोकाचे पाऊल उचलले आहे. शनिवारी दुपारी दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन त्याने गंगा नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

पोलीस गंगा नदीत उडी घेतलेल्या बाप आणि मुलाचा शोध घेत आहेत परंतु जसंजसं त्यांना शोधण्यात वेळ होत आहे तशी आशा संपत चालली आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजता एक युवक त्याच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सीतून बैराज पूरच्या गेट नंबर १७ ला आला. त्याने आधी पायातील चप्पल काढली, मोबाईल चप्पलेजवळ ठेवला. इतरांना काही कळणार इतक्यातच त्याने मुलाला मिठीत घेऊन गंगा नदीत उडी घेतली. टॅक्सी चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. त्यावेळी पुलाची दुरुस्ती काम करणारे लोक तिथे जमा झाले. अचानक झालेल्या दुर्घटनेने घटनास्थळी गोंधळ माजला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांनी माहिती घेतली, त्यात नदीत उडी घेणाऱ्या तरुणाची ओळख बीएसएफ जवान राहुल असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. बोटीच्या मदतीने बीएसएफ जवान आणि त्याच्या दीड वर्षाचा मुलाचा शोध सुरू होता परंतु संध्याकाळपर्यंत काही हाती लागले नाही. राहुल आणि त्याची पत्नी मनीषा यांचं ३ वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झाले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, परंतु हळूहळू किरकोळ गोष्टींवरून वाद सुरू झाले. राहुल सध्या अहमदाबाद येथे तैनात होता. मार्च महिन्यात तो १ महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. त्याचवेळी पॅरालाइसिस अटॅक आल्याने त्याने ५ महिने सुट्टी वाढवली होती. 

५ दिवसांपूर्वी राहुल आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. त्या वादात मनीषा घराबाहेर पडली आणि तिने गंगा नदीत उडी घेतली. मनीषाचा अद्याप शोध लागला नाही. परंतु तिच्या नातेवाईकांनी राहुलवर मानसिक छळ, हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दिली. पत्नीचा विरह आणि सासरच्यांनी केलेले आरोप यामुळे राहुलला नैराश्य आले होते. अलीकडेच पत्नीने गंगा नदीत उडी घेतली, त्यानंतर राहुलने त्याच्या दीड वर्षाच्या मुलासह गंगेत उडी घेतली. त्यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या या तिघांचाही शोध घेतला जात आहे.  

Web Title: BSF jawan jumps into Ganga river while holding one and a half year old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.