उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील खोया मंडी परिसरात २५ फेब्रुवारीच्या रात्री ६५ वर्षीय किरण पुरवार या वृद्ध महिलेची त्यांच्याच घरात हत्या करण्यात आली. किरण यांना पॅरालिसिस झालं होतं. त्यांची मोलकरीण आशा रॅकवार हिने आपला २७ वर्षांचा मुलगा सोनू याच्या मदतीने उशीने तोंड दाबून त्यांची हत्या केली. घटनेच्या वेळी महिलेचे पती संतोष पुरवार हे आपल्या किराणा दुकानात होते.
पोलिसांना घटनास्थळी काचेच्या बांगडीचा एक तुकडा सापडला, ज्याचं कनेक्शन थेट मोलकरणीच्या हातातील बांगड्यांशी जुळलं आणि या हत्या प्रकरणाचा खुलासा झाला. पकडलं जाण्याच्या भीतीने आरोपींनी ही चोरीची घटना असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. महिलेचे कानातले देखील काढून घेतले होते.
सीओ अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पुरवार या आजारपणामुळे पूर्णपणे मोलकरीण आशावर अवलंबून होत्या. चौकशीत असं समोर आलं की, कामात निष्काळजीपणा झाल्यावर किरण या आशाला वारंवार रागावत असत आणि कधीकधी अपशब्दांचा किंवा शिव्यांचा वापर करत असत. टोमणे मारत असत.
सतत होणाऱ्या या अपमानामुळे संतप्त होऊन आशाने आपला मुलगा सोनू याच्यासह किरण यांना संपवण्याचा मोठा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा घरात कोणीही नव्हतं, तेव्हा दोघांनी मिळून ही हत्या केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसपी प्रबल प्रताप सिंह यांनी सर्व्हिलन्स, एसओजी आणि फॉरेन्सिकसह चार पथकं तयार केली होती.
सुरुवातीला चोरी झाल्याचं वाटत होतं, मात्र घटनास्थळी सापडलेल्या बांगडीच्या तुकड्याने तपासाची दिशाच बदलली. पोलिसांनी संशयावरून मोलकरणीची कसून चौकशी केली आणि बांगडीच्या तुकड्याची पडताळणी केली असता तो तुकडा तिच्या बांगडीशी तंतोतंत जुळला. यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि मुलाला अटक केली. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.