शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 14:13 IST2024-10-01T14:13:21+5:302024-10-01T14:13:36+5:30
crime news : सिवनी येथील घनसौर ब्लॉकमध्ये असलेल्या दुचाकी शोरूममध्ये शुक्रवारी चोरीची घटना घडली.

शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की'
मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिवनी येथे चोरट्यांनी एका शोरूमचे कुलूप तोडून दुचाकीसह ५० हजारांचा ऐवज लुटला. इतकंच नाही तर शोरूमच्या शटरवर चोरट्यांनी 'विजय चोराचा' असंही लिहिलं होतं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चोरांना पकडण्यासाठी कारवाई सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिवनी येथील घनसौर ब्लॉकमध्ये असलेल्या दुचाकी शोरूममध्ये शुक्रवारी चोरीची घटना घडली. सकाळी शोरूमचे मालक तेथे पोहोचले असता शोरूमचे कुलूप तुटलेलं दिसलं, त्यांनी आत जाऊन पाहिले असता एक दुचाकी आणि ५० हजार रुपये गायब असल्याचं निदर्शनास आलं. तसंच, चोरी करताना चोरट्यांनी शटरवर 'जीत चोर की' असं लिहून एकप्रकारे आव्हानही दिलं.
शोरूम मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस जवळपास बसवलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना घनसौर पोलीस स्टेशनचे प्रभारी डोमनसिंग मरावी यांनी सांगितलं की, दुचाकी शोरूममध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली असून, चोरट्यांनी शोरूमचे कुलूप तोडून दुचाकी चोरून नेली. लवकरच चोर पकडले जातील. यासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच स्थानिक लोकांची चौकशी केली जात आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांनी दोन वाहन चोरांना अटक केली असून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. मंदसौर येथील सातखेडीमध्ये पोलीस दलाने लादुना गावातून भेरूलाल उर्फ नाना आणि पृथ्वीराज उर्फ पीयूष या दोघा वाहन चोरांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून ५ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे.