लग्न ठरूनही मुलगा आला नाही, नवऱ्या मुलीने धरले घराबाहेर धरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 05:34 IST2022-03-09T05:34:25+5:302022-03-09T05:34:37+5:30
एका लग्नाची अशीही गोष्ट : मुलाच्या वडिलांना अटक

लग्न ठरूनही मुलगा आला नाही, नवऱ्या मुलीने धरले घराबाहेर धरणे
जयपूर : साखरपुडा झाला. लग्नाचा मुहूर्त ठरल्यापासून मुलीच्या घरी लगीनघाई सुरू झाली. ठरलेल्या मुहूर्ताच्या दिवशी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करून वधूकडची मंडळी मुलाच्या वरातीची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होती. चार मार्चला एका मुलीचे लष्करात असलेल्या मुलासोबत लग्न होणार होते; परंतु नवऱ्या मुलाची वरातच आली नाही. अखेर नाराज झालेली नवरी मुलगी आपल्या भावी सासऱ्याच्या घराबाहेर दोन दिवसांपासून धरणे देत ठिय्या मांडून आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांविरुद्ध विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली. त्याआधारे मथुरा गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे नवऱ्या मुलाच्या भरतपूरमधील घराबाहेर धरणे आंदोलन सुरूच आहे, असे भरतपूरचे पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले.
मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नवऱ्या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. लग्न ठरलेल्या लष्करातील अरुण कुमारसोबत बोलण्याचा आग्रह धरून ती मुलगी धरणे देऊन आहे.
अरुण कुमार हा स्वत: मथुरेतील लष्कराच्या इस्पितळात दाखल झाला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी इस्पितळातून त्याला कधी सुटी मिळते, याची पोलीस वाट पाहत आहेत. मुलाच्या कुटुंबीयांविरुद्ध भादंवि कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.