प्रियकराने मित्राच्या मदतीने केली अल्पवयीन मुलीची हत्या, वालीव पोलीस करत आहे मारेकऱ्यांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 11:09 IST2022-08-30T11:08:55+5:302022-08-30T11:09:03+5:30
नायगाव येथे बॅगेत सापडलेल्या शाळकरी मुलीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे.

प्रियकराने मित्राच्या मदतीने केली अल्पवयीन मुलीची हत्या, वालीव पोलीस करत आहे मारेकऱ्यांचा शोध
मंगेश कराळे, नालासोपारा-
नायगाव येथे बॅगेत सापडलेल्या शाळकरी मुलीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने हत्या केली होती. हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी नायगावच्या परेरा नगर परिसरात उड्डाणपुलाखाली झुडपात एका पिशवीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह लोकांनी दाखवला होता. तिच्या पोटावर १२ ते १५ वार करून निर्दयीपणे खून झाल्याची शक्यता वालीव पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना मृताच्या बॅगेजवळ शाळेचा बॅच सापडल्याने मृत मुलीची ओळख पटली होती. ही मुलगी विलेपार्ले येथील शाळेत नववीच्या वर्गात शिकत असून गुरुवारी सकाळी ती शाळेसाठी निघाली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. नातेवाइकांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिस ठाण्यात मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणीची हत्या केली आहे. गुरुवारी मृत तरुणीचा प्रियकर तरुणीला त्याच्या मित्राच्या जुहू येथील घरी घेऊन गेला होता. त्या मित्राचे आई-वडील कामावर गेले होते. दोघांनी घरातच मुलीची हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरी असलेल्या ट्रॅव्हल बॅगमध्ये भरला होता. या पिशवीत मृतदेह कापडाने झाकलेला होता. पिशवीत मृतदेह घेऊन दोघेही विरार लोकलने नायगावला आले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. हे दोन्ही आरोपी विरारहून गुजरातला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
आम्हाला काही प्रत्यक्षदर्शी मिळाले आहेत ज्यांनी मुलीला घरात नेताना पाहिले. या हत्येत दोघांचा सहभाग आहे. लवकरच आरोपींना अटक करू. त्याच्या अटकेनंतरच प्रियकराने केलेल्या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल.
- राहुल पाटील (पोलिस निरीक्षक (गुन्हे), वालीव पोलीस ठाणे)