गणपती दर्शनाला गुजरातला गेला अन् किडनॅप झाला; ५ दिवसांनंतर मुलाची थरारक सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 11:50 IST2025-09-21T11:49:40+5:302025-09-21T11:50:13+5:30
मोबाइल सीडीआरच्या आधारे पोलिसांची टीम गुजरातला रवाना केली. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

गणपती दर्शनाला गुजरातला गेला अन् किडनॅप झाला; ५ दिवसांनंतर मुलाची थरारक सुटका
पंकज पाटील
अंबरनाथ - गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले. तब्बल पाच दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता. अपहरण झालेल्या मुलाची सुटका आरोपींनी केल्यानंतर हा मुलगा घरी न येता गुजरात पोलिसांपासून वाचण्यासाठी पुन्हा बेपत्ता झाला. मात्र, बदलापूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
वांगणीतील महिलेचा अल्पवयीन मुलगा १ सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनसाठी गेला होता. त्यावेळी तिथे तीन जणांनी त्याचे अपहरण केले आणि फोनवरून त्याच्या आईकडे १२ लाखांची खंडणी मागितली. तिने त्वरित बदलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाइल सीडीआरच्या आधारे पोलिसांची टीम गुजरातला रवाना केली. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र खरा थरार तिथूनच सुरू झाला. सुटका झाल्यानंतर मुलगा पुन्हा बेपत्ता झाला.
ग्रामस्थांनी घातला पोलिसांना घेराव
गुजरात पोलिस अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत एका गावात गेले. मात्र त्या ठिकाणी आरोपींना ताब्यात घेताना संपूर्ण गावाने गुजरात पोलिसांना घेराव घातला होता.
मोबाइलच केला बंद
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अपहरण झालेल्या मुलाची भीतीपोटी सुटका केल्याचे स्पष्ट झाले. मात्र सुटका झाल्यानंतर तो मुलगा पोलिसांच्या हाती लागला नाही. ज्या मोबाइल नंबरचा माग काढत बदलापूर पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले तो नंबर त्याने बंद केला आणि नवीन नंबर घेतला. मोबाइलच्या सिरीयल नंबरवरून त्या सिमकार्डचा शोध घेत पुन्हा या अपहरण झालेल्या मुलाचा जळगाव जिल्ह्यातून शोध घेतला.
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती
अपहरणकर्त्यांनी सुटका केल्यानंतर तू पोलिसांकडे का आला नाही याची विचारणा मुलाकडे केली असता गुजरात पोलिस आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवणार, अशी भीती असल्यामुळे मी पोलिसांकडे गेलो नाही, असा खुलासा चाैकशीदरम्यान मुलाने केला.