महामार्गावर 'रॉबरी' करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 21:35 IST2020-03-02T21:35:25+5:302020-03-02T21:35:40+5:30
आरोपी एमपीचे : गुन्ह्यात वापरलेली चारचाकी अपघातग्रस्त

महामार्गावर 'रॉबरी' करणारे दोघे गजाआड
अमरावती : महामार्गावर वाटमारी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. अटक आरोपी मध्यप्रदेशातील आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान लोणी महामार्गावर जीजे ०५ बीएक्स ८४२९ क्रमांकाचा ट्रक उभा असताना अज्ञात चार इसमांनी चारचाकी वाहनातून येऊन ट्रक चालकास चाकुचा धाक दाखविला. ट्रक चालकाजवळील १७ हजार रुपय रोख व ३ हजार रुपयांचा मोाबईल असा २० हजार रुपयांचा ऐवज जबरीने घेऊन पसार झाले. याप्रकरणी लोणी पोलिसांत भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व टोल नाक्यावरील फुटेजची पाहणी केली. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे सुनील रामचंद्र फुलेरीया (३४, रा. दुपाडा, जि. शाजापूर, मध्यप्रदेश) यांच्या नावाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. पथकाने खंडवा, इंदौर, भोपाळ, शाजापूर, देवास येथे विविध ठिकाणी ३ ते ४ दिवस तळ ठोकला. सदर वाहनाचा मालक सुनील रामचंद्र फुलेरीया हा मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील दुपाडा येथे असल्याबाबतची माहिती मिळाली. दुपाडा हे चारचाकी वाहनातील डिझेल तसेच इतर मौलवान वस्तू चोरी करणाºया गुन्हेगारांचे गाव असल्याबाबत माहिती मिळाली. सदर पथकाने सुनील फुलोरीया याला ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्यात श्रावण हरनाथसिंग चौहान (२०, रा. विकासनगर, देवास, मध्यप्रदेश), धर्मेंद्र शिवनारायण सोलंकी (२५, रा. दुपाडा), कमल हे सहभागी असल्याबाबत सांगितले.