तलावात आढळला मॉडेलचा मृतदेह, दिव्या पहुजाच्या हत्येनंतर दहा दिवसांनी सापडले प्रेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 10:15 IST2024-01-14T10:14:33+5:302024-01-14T10:15:47+5:30
२ जानेवारीला दिव्या पहुजाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती.

तलावात आढळला मॉडेलचा मृतदेह, दिव्या पहुजाच्या हत्येनंतर दहा दिवसांनी सापडले प्रेत!
गुरुग्राम : हत्या झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हरयाणा पोलिसांना दिव्याचा मृतदेह तोहाना येथील कॅनॉलमध्ये आढळला आहे.
२ जानेवारीला दिव्या पहुजाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेत असतानाचे आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आढळून आले होते. त्याआधारे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या तपासानंतर दिव्या पहुजाच्या मृतदेहाचा ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्यानंतर शोधमोहीम हाती घेऊन पोलिसांनी दिव्याचा मृतदेह तोहाना येथील कॅनॉलमधून शोधून काढला.
मित्राने का केली हत्या?
नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्या अभिजितसोबत फिरायला गेली होती. दोन दिवस तिचा काहीच पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अभिजितच्या मालकीच्या असणाऱ्या सीटी पॉइंट हॉटेलमध्ये दोघे एकत्रच आल्याचे समजले. अभिजितच्या जबाबानुसार, दिव्याकडे त्याचे काही अश्लील फोटो होते. हे फोटो त्याने डिलीट करण्याची विनंती केली. पण, तिने नकार दिल्यानंतर रागात अभिजितने दिव्याची गोळ्या झाडून हत्या केली.
नेमके प्रकरण काय?
२७ वर्षीय मॉडेल दिव्या पहुजा हिच्यावर एका गँगस्टरच्या हत्येचाही आरोप होता. हरयाणामधील संदीप गडोली या गँगस्टरची मुंबईत एका हॉटेलच्या खोलीत २०१६ साली हत्या करण्यात आली. यात तिचे नाव पहिल्यांदा पुढे आले होते.
या प्रकरणात दिव्या पहुजाला तुरुंगवासही झाला होता. नुकतीच तिची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे या गँगस्टरांपैकी कुणीतरी दिव्याची हत्या केल्याचा किंवा तिच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, तपासाअंती तिचा मित्र अभिजित सिंहनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.