मित्राची कार घेऊन १० दिवस होता बेपत्ता, अखेर बंधाऱ्यात सापडला पत्रकराचा मृतदेह, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 21:16 IST2025-09-29T20:22:03+5:302025-09-29T21:16:59+5:30
Journalist Rajiv Pratap Death: १८ सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले पत्रकार राजीव प्रताप यांचा मृतदेह रविवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील एका बंधाऱ्यातून ...

मित्राची कार घेऊन १० दिवस होता बेपत्ता, अखेर बंधाऱ्यात सापडला पत्रकराचा मृतदेह, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Journalist Rajiv Pratap Death: १८ सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले पत्रकार राजीव प्रताप यांचा मृतदेह रविवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील एका बंधाऱ्यातून सापडला. पत्रकार राजीव प्रताप यांचा मृतदेह जोशीदा बंधाऱ्यातून सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राजीव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गूढ परिस्थितीत बेपत्ता झालेल्या राजीव प्रताप यांच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री धामी यांनी दिले.
उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवासी असलेले पत्रकार राजीव प्रताप सिंह यांचा मृतदेह रविवारी जोशीदा बॅरेजमधून सापडला. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या संयुक्त बचाव पथकाने बराच प्रयत्न केल्यानंतर मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर राजीव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली आहे. गेल्या १० दिवसांपासून ते बेपत्ता होते. पोलिस आणि त्यांचे कुटुंब त्यांचा शोध घेत होते.
१८ सप्टेंबरच्या रात्री, राजीव प्रताप एका मित्राची गाडी घेऊन उत्तरकाशीतील ग्यानसू येथून गंगोरीला निघाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परतले नाही तेव्हा त्यांच्या कुटुंबाने शोध सुरू केला. १९ सप्टेंबर रोजी पोलिसांना सुयुना गावाजवळील भागीरथी नदीत ती गाडी सापडली. राजीवही याच गाडीत सोडून गेले होते. गाडीची झडती घेतली असता काहीही सापडलं नाही. यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले. यावरून, राजीवच्या कुटुंबाला अपहरणाचा संशय आला आणि त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली.
राजीव बेपत्ता झाल्यापासून त्यांचा कसून तपास सुरु होता. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांच्या पथकांनी शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी जोशीदा बॅरेजजवळ त्यांचा मृतदेह सापडला. राजीव यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कार नदीत कशी गेली? राजीव प्रताप गाडीत का नव्हते? हा अपघात होता की त्यामागे काही कट होता? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
दरम्यान, राजीव प्रतापयांनी २०२०-२१ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली येथून हिंदी पत्रकारितेत पोस्ट-जर्नालिझम डिप्लोमा पूर्ण केला. ते दिल्ली उत्तराखंड लाईव्ह हे डिजिटल न्यूज चॅनेल चालवत होते आणि उत्तरकाशीतील स्थानिक समस्या मांडत होते.