ठाण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत; १० दिवस तेच पाणी पीत होते रुग्ण आणि विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:08 IST2025-10-10T13:04:58+5:302025-10-10T13:08:08+5:30
उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत महाराष्ट्रातील रुग्णाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

ठाण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत; १० दिवस तेच पाणी पीत होते रुग्ण आणि विद्यार्थी
UP Crime: उत्तर प्रदेशातील देवरिया येथील महर्षी देवरहा बाबा वैद्यकीय महाविद्यालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीमध्ये महाराष्ट्रातील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि रुग्णालयातील व्यक्ती जवळपास १० दिवसांपासून याच टाकीतील पाण्याचा वापर करत होते. पाण्यातून वास येण्याच्या तक्रारी आल्यानंतर तपासणी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.
अशोक गावंडे (६१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे आणि ते ठाण्यातील रहिवासी होते. पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना २५ सप्टेंबर रोजी महर्षी देवरहा बाबा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांनी ते बेपत्ता झाले. या प्रकरणानंतर रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर घटना घडली. रुग्णालयातील नोंदीवरून गावंडे यांची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१० दिवस रुग्णालयातील ओपीडी आणि वॉर्डमध्ये पुरवठा होत असलेल्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. अनेकांच्या
वारंवारच्या तक्रारीनंतर ६ ऑक्टोबर रोजी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाचव्या मजल्यावर असलेल्या पाण्याची टाकी तपासली. टाकीचे झाकण उघडताच आतमध्ये एक कुजलेला मृतदेह तरंगताना आढळला. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने टाकीतून कुजलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले आणि मृत व्यक्ती अशोक गावंडे असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दिव्या मित्तल यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी पाण्याची टाकी उघडी असल्याचे आणि सुरक्षिततेत अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणले. त्यांनी तातडीने रुग्णालयाच्या प्राचार्यांना पदावरून हटवले आहे. तसेच, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले असून, आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
उत्तर प्रदेशात कसे पोहोचले अशोक गावंडे?
ठाण्याच्या चंद्रोदय कॉम्प्लेक्ससमोरील आदित्य विश्व कॉम्प्लेक्स येथील रहिवासी अशोक गावंडे यांच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला.त्यांची पत्नी अनिता यांनीही हा मृतदेह तिच्या पतीचा असल्याचे पुष्टी केली. पोलिसांनी मेडिकल कॉलेज कॅम्पसच्या आपत्कालीन कक्षातून सीसीटीव्ही फुटेज मिळवले. २७ सप्टेंबर रोजी लुंगी आणि निळा शर्ट घातलेला एक रुग्ण १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून आला आणि त्याच्यावर आपत्कालीन कक्षात उपचार सुरु होते असंही पोलिसांनी सांगितले. रजिस्टरमध्ये त्यांचे नाव अशोक असे नोंदवले होते. एका पायाला जखम झाल्यामुळे, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल केले. २५ सप्टेंबर रोजी अशोक यांना रुग्णवाहिकेने आणून आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केले होते. अशोक २७ तारखेला सकाळी वॉर्डमधून बाहेर पडले आणि २७ तारखेला दुपारी २ वाजता परतले. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले.
पोलिसांना पाण्याच्या टाकीजवळ सापडलेल्या लुंगी आणि निळ्या शर्टमध्ये अशोक यांना रुग्णालयात आणलं होतं. तपासात औरचौरा शर्मा ढाबाच्या समोर रस्त्याच्या कडेला अशोक हे वेदनेने तडफडत होते. त्यांच्या पायावर जखम होती आणि तो काहीही सांगू शकत नव्हते. अशोक गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या कुटुंबापासून दूर राहत होते आणि ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. ते देवरियाला कसे पोहोचले आणि तो मेडिकल कॉलेजच्या टाकीत कसा पोहोचले हे आता पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. चार महिने त्यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.