AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:05 IST2025-08-23T16:05:01+5:302025-08-23T16:05:44+5:30
या मुलीचे अपहरण तिच्या नातेवाईकानेच केले होते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली

AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
मुंबई - मुंबई - कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या बाथरूममध्ये ५ वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने ट्रेनमधील प्रवाशांमध्ये खळबळ माजली. या घटनेची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी ट्रेनच्या बाथरूममध्ये आढळलेला मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. या प्रकरणाचा पोलीस तपास करण्यात येत आहे.
माहितीनुसार, मुलीचा मृतदेह लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये टॉयलेटमधील कचरापेटीत सापडला. या मुलीचे वय साधारण ५ वर्ष आहे. ट्रेनच्या एसी कोच बी २ या बोगीत बाथरूममध्ये हा मृतदेह एका प्रवाशाने पाहिला. ही बातमी कळताच बोगीमधील प्रवाशांमध्ये दहशत पसरली. त्यातील एका प्रवाशाने ही माहिती तात्काळ रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना दिली. या घटनेच्या प्राथमिक तपासात मुलीचे अपहरण करण्यात आले होते त्यानंतर तिची हत्या केली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
या मुलीचे अपहरण तिच्या नातेवाईकानेच केले होते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. त्यात या मुलीच्या मावस भावाने तिचे अपहरण केल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी संबंधित लोकांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. अपहरण आणि हत्या या अँगलने पोलीस घटनेतील पुरावे गोळा करत आहे.
दरम्यान, नुकतेच नागपूर येथे ९ वीत शिकणाऱ्या २ मुली ट्रेनमध्ये सापडल्या होत्या. सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये बसून त्या मुंबईच्या दिशेने येत होत्या. घरातून शिकवणीसाठी बाहेर पडलेल्या मुली घरच्यांना न सांगताच मुंबईला जात होत्या. मात्र एस ५ कोचमध्ये एका टीसीने या दोघींकडे तिकिटाची मागणी केली, तेव्हा त्यांच्याकडे तिकिट नव्हते. आधीच भेदरलेल्या या मुली आणखी घाबरल्या. टीसीने या मुलींची माहिती घेतली तेव्हा त्यांच्यासोबत कुणीच ओळखीचे अथवा कुटुंबातील व्यक्ती नव्हते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या मुलींना रेल्वे पोलिसांकडे देण्यात आले. त्यानंतर या मुलींना सुखरूप त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.