विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला, डोर्लेवाडी गावात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:50 IST2018-12-22T23:50:04+5:302018-12-22T23:50:17+5:30
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेशेजारील विहिरीमध्ये आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला, डोर्लेवाडी गावात खळबळ
बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेशेजारील विहिरीमध्ये आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोमल हनुमंत जाधव असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
कोमल ही येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. २१) नेहमीप्रमाणे कोमल शाळेत गेली होती. मात्र, शाळेचा पहिला तास झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्यादरम्यान भावाला भेटायला जायचे आहे, असे शाळेत सांगून बाहेर पडली. काही वेळाने शिक्षकांनी कोमल शाळेतून घरी आल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी कोमल घरी न आल्यामुळे पालकांनी व तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून न आल्याने तिच्या पालकांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, शनिवारी (दि. २२) दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्या कुटुंबीयांनी कोमलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी हायस्कूलशेजारी असणाºया सरकारी विहिरीतच हरवलेल्या कोमलचा मृतदेह आढळून आला. कोमलची आत्महत्या की हत्या याबाबत गूढ आहे. याबाबत बारामती शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तपास अधिकारी नीलेश अपसुंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की याप्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पोलिसांची चौकशी सुरू आहे, तर पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की मुलगी बेपत्ता झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २१) कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. क ोमल हिच्या मृत्यूप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार एक जण तिला त्रास देत होता. त्याच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. क ोमल हिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर पोलीस तपासाला दिशा मिळेल.
डोर्लेवाडी परिसरात यापूर्वीदेखील रोडरोमिओंनी त्रास दिल्याने युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच सावकारीच्यादेखील घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे डोर्लेवाडी परिसर पुन्हा चर्चेत आला आहे.