जमीन वाटणी वादातून रक्तरंजित संघर्ष; एकाच कुटुंबातील ३ जणांना कुऱ्हाडीने संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:44 IST2025-01-10T17:42:42+5:302025-01-10T17:44:19+5:30
आरोपी भावाने काही गुंडासह तिथे घुसून कुटुंबाला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला.

जमीन वाटणी वादातून रक्तरंजित संघर्ष; एकाच कुटुंबातील ३ जणांना कुऱ्हाडीने संपवलं
छत्तीसगडच्या सूरजपूर इथं जमिनीच्या वादातून ३ जणांची हत्या करण्यात आली आहे. २०-३० लोकांनी कुऱ्हाडीने, लाठीकाठीने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. ज्यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला होता. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु त्याने जीव सोडला. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
सूरजपूरच्या डुबकापारा परिसरात एका कुटुंबाची ७ एकर जमीन होती. या जमीन वाटणीवरून भावांमध्ये वाद सुरू होता. त्यातच आज पीक लावण्यावरून दोन्ही भाऊ आणि त्यांच्या कुटुंबात हाणामारी झाली. वाद इतका विकोपाला गेला की एका भावाने कुऱ्हाडीने हल्ला केला ज्यात माधे टोप्पो यांची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर माधे टोप्पो गंभीरपणे जखमी झाले होते. माधे टोप्पो यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांना तपासाला सुरुवात केली.
तिघांची हत्या
जमिनीच्या वादातून दोन भावांच्या कुटुंबामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात कुटुंबातील तिघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मृतांमध्ये बसंती टोप्पो, नरेश टोप्पो आणि माधे टोप्पो यांचा समावेश आहे. मृत कुटुंबाने २ महिन्यापूर्वीच जिल्हा सत्र न्यायालय आणि एसडीएम कोर्टात ७ एकर जमिनीचा खटला जिंकला होता. शुक्रवारी मृत व्यक्ती कुटुंबासह शेतात पीक लावणी करण्यास आले. त्याचवेळी आरोपी भावाने काही गुंडासह तिथे घुसून कुटुंबाला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या हत्याकांडानंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने भरदिवसा शेतात ३ जणांवर जीवघेणा हल्ला होतो ज्याची भनक पोलिसांना लागत नाही. पोलीस जर वेळीच घटनास्थळी पोहचले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.