BMW कारचा कन्व्हर्टर चोरताना चोरट्याचा मृत्यू; जॅक कोसळल्यानं चोर चिरडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:28 IST2021-09-01T15:26:49+5:302021-09-01T15:28:24+5:30
कन्व्हर्टर चोरताना अचानक कारला लावलेला जॅक कोसळला; कारखाली येऊन चोराचा मृत्यू

BMW कारचा कन्व्हर्टर चोरताना चोरट्याचा मृत्यू; जॅक कोसळल्यानं चोर चिरडला
लंडन: बीएमडब्ल्यू कारचा सुटा भाग चोरताना चोरट्याचा मृत्यू झाला आहे. तार्फेन प्रांतात ही घटना घडली. कारचा कॅटलिक कन्व्हर्टर चोरत असताना जॅक कोसळल्यानं चोरट्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कार चालकाला कारच्या खाली एक पाय दिसून आला. त्यानंतर या चोरीचा उलगडा झाला.
न्यायालयीन प्रकरणात पैशांची गरज असल्यानं डॅनियल स्टिफन्स नावाची व्यक्ती रसेल सेल्डोन यांच्या कारचा कन्व्हर्टर चोरण्यासाठी आली होती. त्यासाठी त्यानं कार जॅकवर उभी केली. जॅक लावून तो कारच्या खाली शिरला. कन्व्हर्टर काढत असताना कार त्याच्या अंगावर कोसळली. त्यात स्टिफन्सचा मृत्यू झाला. कारखाली एका व्यक्तीचा पाय आढळून आल्यानं सेल्डोन यांनी आपत्कालीन सेवा देणाऱ्या पथकाला बोलावलं. मात्र स्टिफन्सनं त्याआधीच प्राण सोडला होता.
जॅकवर लावलेली कार कोसळल्यानं स्टिफन्सचा मृत्यू झाला. कार उचलण्यात आली, तेव्हा स्टिफन्स दिसून आला. त्याच्या शरीराची हालचाल बंद पडली होती. छातीला गंभीर इजा झाली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी लेह जेफ्रीस यांनी दिली. स्टिफन्सच्या मृतदेहाजवळ जॅक आणि टॉर्च आढळून आला.
स्टिफन्सचा घटस्फोट झाला होता. पत्नीसोबत राहत असलेल्या मुलांना अधिक वेळ भेटण्यासाठी त्यानं न्यायालयात धाव घेतली होती. त्या खटल्यासाठी त्याला अधिक पैशांची गरज होती. मात्र पैसे नसल्यानं तो तणावाखाली गेला होता, अशी माहिती स्टिफन्सचा मित्र अरोन गॉडफ्रेनं दिली. कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नकोस, असं अरोननं स्टिफन्सला सांगितलं होतं. मात्र त्यानं एका बीएमडब्ल्यू कारचा कन्व्हर्टर चोरण्याचा कट रचला, अशी माहिती गॉडफ्रेनं दिली.