भाजपा खासदाराच्या बहिणीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:43 IST2025-09-08T11:42:31+5:302025-09-08T11:43:04+5:30
या प्रकरणावर २० सेकंदचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करत चौकशीला सुरुवात केली आहे.

भाजपा खासदाराच्या बहिणीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद येथे भाजपा खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणीला भररस्त्यात काठीने बेदम मारण्यात आले. या महिलेला मारणारे व्यक्ती तिचे सासरे आणि दीर आहेत. कासगंज येथील त्यांच्या घराबाहेर घडलेला हा हायव्होल्टेज ड्रामा सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीवेळी खासदाराची बहीण जोरजोरात ओरडत होती. सासरा आणि २ दीरांनी मिळून खासदाराच्या बहिणीला चोपले. एकाने रस्त्यात तिचे केस ओढत तिला खेचले तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने तिला मारले. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
भाजपा खासदाराच्या बहिणीने तिच्या सासरच्यांवर आरोप केला होता. जेव्हा ती अंघोळ करायला गेली, तेव्हा सासरे आणि दीरांनी तिचा व्हिडिओ बनवला. या गोष्टीला विरोध केला म्हणून त्यांनी शिवीगाळ केली. मारहाण सुरूवात केली असा आरोप महिलेने केला. पीडित महिलेने आरोपी सासरे, दीरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करत चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेत सासऱ्याने स्वत:च मारहाण केली आणि व्हिडिओही बनवला. २० सेकंदचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात भाजपा खासदाराच्या बहिणीला सासरे हातात दांडके घेऊन मारत आहेत आणि दुसऱ्या हातात मोबाईल असून त्यात ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत.
या व्हिडिओत सून रिनाचा आवाज ऐकायला मिळतो, त्यात ती मला मारा, मला मारा असं बोलते, सासरे तिला धमकावतात. काठीची भीती दाखवतात. जसे ती लांब जाते, तसे सासरे तिच्यावर काठीने हल्ला करतात. ४ सेकंदात ५ वेळा काठीने मारल्याचे दिसते. त्यानंतर एक दीर तिचे केस ओढून खेचताना दिसतो. रस्त्यावर एक जण व्हिडिओ बनवत असतो, त्याच्या हातावर दीर मारतो आणि व्हिडिओ बंद करायची धमकी देतो. फर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत यांची बहीण रिना सिंह तिच्या सासरी राहते. १७ वर्षापूर्वी तिचे लग्न लक्ष्मण सिंहचा मुलगा शेखेंद्र सिंह याच्यासोबत झाले.
रिनाने काय लावले आरोप?
रिनाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यात तिने सांगितले की, रविवारी दुपारी १ वाजता मी माझ्या बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा माझा दीर गिरीश आणि सासरे लक्ष्मण सिंह माझा व्हिडिओ बनवत होते. माझी नजर त्यांच्यावर पडली तेव्हा मी त्याचा विरोध केला. या दोघांनी मला शिव्या दिल्या. त्यानंतर सासऱ्यांनी परवानाधारक रायफल आणली आणि तुला गोळ्या घालीन अशी धमकी दिली. कसेतरी मी जीव वाचवून घरातून पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुसरा दीर राजेशने चाकूने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझ्या हाताला जखम झाली. घरातून बाहेर पडताना मला लोखंडी रॉडने मारले. मी माझा जीव वाचवून तिथून पळाले. त्यानंतर घराबाहेर परिसरात माझ्यावर सगळ्यांसमोर हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप तिने केला आहे.