उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. सपाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याविरोधात निवडणूक लढणाऱ्या भाजप नेत्याची विषारी इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली आहे. मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी घरात घुसून त्यांना हे इंजेक्शन टोचले आणि फरार झाले.
गुलफाम सिंह यादव हे त्यांच्या घरात बसलेले होते. तेव्हा अचानक तिघेजण आले आणि त्यांच्याशी जबरदस्तीने वाद घालू लागले. इतक्यात एकाने त्यांना पकडले आणि दुसऱ्याने त्यांच्या पोटात इंजेक्शन खुपसले आणि सिरिंज रिती केली. यामध्ये विषारी द्रव्य होते. कुटुंबीयांनी यादव यांना स्थानिक सरकारी आरोग्य केंद्रात नेले, परंतू त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना अलीगढला नेण्यास सांगण्यात आले.
अलीगढला जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अलीगढमध्ये पोस्टमार्टेम केले असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यादव हे ७० वर्षांचे होते. पोलीस आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. काही महत्वाचे धागेदोरे हाती मिळालेले आहेत.
तिघांपैकी एकजण आतमध्ये यादव यांना भेटून बाहेर आला होता. त्याने मोटरसायकल सुरु करून ठेवली होती. इंजेक्शन टोचून दोघे बाहेर धावत पळाले, यादव यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतू ते चक्कर येऊन पडले. आरडाओरडा ऐकून घरातील मंडळीही बाहेर आले, बाजुला दोन मजूर होते, त्यांनीही मदत केली.
२००४ मध्ये गुन्नौर विधानसभा पोटनिवडणुकीत मुलायम सिंह यादव यांच्याविरुद्ध गुलफाम सिंह यादव भाजपचे उमेदवार होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह, भाजप जिल्हा सरचिटणीस आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे भाजप उपाध्यक्ष देखील होते. त्यांचा मोठा मुलगा दिव्य प्रकाश हा संभळ जिल्ह्यातील जनाबाई ब्लॉकचा ब्लॉक प्रमुख आहे.