मुंबई - महाराष्ट्राचं राजकारण हनी ट्रॅप प्रकरणानं चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणी विधान सभेत विरोधकांनी आवाज उचलला परंतु ना हनी, ना ट्रॅप असे कुठलेही प्रकरण नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला. मात्र आता जळगावातील भाजपा नेत्याचा निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
जळगावच्या पहूर येथील प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबई येथील साकीनाका व अंधेरी पोलिस ठाण्यात हनी ट्रॅप, पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, प्रफुल्ल लोढा हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटचे कार्यकर्ते आहेत. काही वर्षांपूर्वी लोढा यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यानंतर काय चमत्कार झाला कुणास ठाऊक, लोढा हे अचानक कोट्यवधींचे मालक झाले. प्रफुल्ल लोढा अटक झाल्यानंतर ५ जुलै रोजी मुंबई पोलिस जळगावला आले होते. त्यांनी जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते.
तपासणी सीडीसाठीच...
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात लोढाविरोधात तक्रार आली होती. त्यावेळी पोलिसांनी तपासणी केली. १५-२० दिवसांपूर्वी लोढा यांच्या पहूर, जामनेर, जळगाव, नाशिक येथील घरी पोलिसांनी छापा टाकला. ही तपासणी सीडीसाठीच असल्याचा दावा खडसे यांनी केला.
मुलींसोबत अश्लील वर्तवणूक
साकीनाका पोलिसांनी ५ जुलैला चकाला येथील लोढा हाऊसमधून त्यांना अटक केली होती. ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा यांच्यावर नोकरीचं आमिष दाखवून १६ वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत अश्लील वर्तवणूक केल्याचा आरोप आहे. या दोन्ही मुलींवर अत्याचार करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो घेण्यात आले. इतकेच नाही तर या मुलींना लोढा हाऊसमध्ये बंद करून धमकावल्याचाही आरोप आहे.
कोण आहे प्रफुल्ल लोढा?
प्रफुल्ल लोढा हे जळगावातील भाजपा नेत्याचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने त्यांना तिकिट दिले परंतु ५ दिवसातच ही उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता हेच हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. चर्चेतील हनी ट्रॅप संदर्भातील वेगवेगळे मुद्दे बाहेर येत आहेत. महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १० कोटींची मागणी झाल्याने संबंधित अधिकारी अस्वस्थ झाला व या प्रकरणाला वाचा फुटल्याची चर्चा आहे.