बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 05:34 IST2025-12-15T05:33:48+5:302025-12-15T05:34:13+5:30
२६ वर्षीय तरुणीने जिमला जाण्यासाठी एका नामांकित अॅपद्वारे बाइक बुक केली होती. बाइकचालकाने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र..

बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
कल्याण: उबर कंपनीच्या अॅपद्वारे बाइक बुक केलेल्या तरुणीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करणान्या, इतकेच नव्हे तर अॅसिड हल्ल्याची धमकी देऊन तिच्याकडील दागिने आणि रोकड हिसकावून घेणाऱ्या बाइकचालकाला अटक करण्यात आली आहे.
या तरुणीने धैर्याने प्रतिकार करीत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि पोलिस ठाणे गाठले. या प्रकारामुळे बाइक टॅक्सीसेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास सिंधीगेट भागात घडली. या २६ वर्षीय तरुणीने जिमला जाण्यासाठी एका नामांकित अॅपद्वारे बाइक बुक केली होती. बाइकचालकाने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र, तिला प्रवासाबाबत एसएमएस न आल्याने तिने मोबाइल ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर सिंधीगेट चौकाकडे जाताना अचानक बाइकचालकाने बाइक एका पडक्या इमारतीकडे वळवली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तरुणीने बाइकवरून उडी मारली. त्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली.
चाकूच्या धाकावर दागिने, रोकड हिसकावली
अवस्थेतही त्याने तिला अंधारात ओढत नेले आणि चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने आणि रोकड हिसकावून घेतली.
अॅसिड हल्ल्याची धमकी
आरोपीने तरुणीला स्प्रे दाखवत अॅसिड हल्ल्याची धमकी दिली. तसेच चाकूचा धाक दाखवून तरुणीकडील सोन्याची आणि मोत्याची माळ, तसेच एक हजार रुपये हिसकावून घेतले. तरुणीने धैर्याने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली आणि तेथून जीवाच्या आकांताने धावत सुटली.
दरम्यान, या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले.
आरोपीची रवानगी कोठडीत
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बाइकचालक सिद्धेश संदीप परदेशी (वय १९, रा. खडकपाडा) याला अटक केली. कल्याण न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.