दुचाकीच्या मिररला धक्का लागला, वादातून तरुणाची भरदिवसा हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 23:27 IST2023-07-09T23:27:10+5:302023-07-09T23:27:43+5:30

नालासोपाऱ्याच्या उड्डाणपुलावरील धक्कादायक घटना

Bike mirror hit, youth killed in broad daylight due to dispute | दुचाकीच्या मिररला धक्का लागला, वादातून तरुणाची भरदिवसा हत्या

दुचाकीच्या मिररला धक्का लागला, वादातून तरुणाची भरदिवसा हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क, 

नालासोपारा (मंगेश कराळे) :- दुचाकीच्या मिररला धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची घटना नालासोपारा उड्डाणपूलावर रविवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या तरुणाची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपी विरोधात नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

संतोष भवनच्या अण्णाडिस कंपाऊंड येथील श्री हरी ओम वेल्फेअर सोसायटीत राहणारा रोहित राजेश यादव (२०) आणि त्याच चाळीत राहणारा मित्र विवेक चौधरी (२३) हे दोघे एकाच दुचाकीवरून रविवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पश्चिमेककडून पूर्वेकडे ओव्हर ब्रीजवरून जात होते. ओव्हर ब्रीजवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी असल्याने रोहितच्या दुचाकीचा पुढे चाललेल्या दुचाकीच्या मिररला धक्का लागला. याचाच राग धरून त्या दुचाकीवरील तिन्ही आरोपीने दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. रोहितच्या छाती पोटावर डोक्यावर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असल्याचे नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Bike mirror hit, youth killed in broad daylight due to dispute