एकतर्फी प्रेमातून हत्येचा थरार; छट पूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर झाडल्या गोळ्या, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:17 IST2023-11-20T11:16:00+5:302023-11-20T11:17:32+5:30
छट पुजेवरून परतणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एकतर्फी प्रेमातून हत्येचा थरार; छट पूजेवरून परतणाऱ्या 6 जणांवर झाडल्या गोळ्या, दोघांचा मृत्यू
बिहारमधील लखीसराय येथे छट पुजेवरून परतणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कबैया पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना गोळ्या लागल्याची माहिती आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी सख्खे भाऊ असलेल्या दोन तरुणांना मृत घोषित केलं. दोन्ही भावांच्या पत्नी, वडील व बहीण जखमी झाले आहेत. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
लखीसरायचे एसपी पंकज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 6 लोक छट पुजेवरून परतत होते. त्यांच्यावर घराजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी त्यांचाच शेजारी असून त्याचे नाव आशिष चौधरी असं आहे. हल्लेखोराचा या कुटुंबाशी 10 दिवसांपूर्वी वाद झाला होता. लखीसरायच्या पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण एकतर्फी प्रेमाचं आहे.
आशिष चौधरी नावाच्या तरुणाचं त्याच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर खूप प्रेम होतं आणि त्याला तिच्याशी लग्न देखील करायचं होतं. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याचाच राग आल्याने तरुणाने मुलीच्या कुटुंबावर थेट गोळीबार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.