शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:20 IST2025-09-03T16:20:23+5:302025-09-03T16:20:39+5:30

मंगळवारी शीना बोरा हत्याकांडात साक्ष देण्यासाठी आलेल्या इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने सीबीआयचे आरोपपत्र फेटाळले.

Big twist in Sheena Bora murder case after 13 years! What did Indrani Mukerjea's daughter say that changed the direction of the case? | शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?

शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?

Sheena Bora Case : देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडाला तब्बल १३ वर्षांनंतर मंगळवारी नवे वळण मिळाले आहे, जे या प्रकरणाच्या तपासाच्या दिशेलाच हादरवून टाकणारे ठरू शकते. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात साक्ष देताना गंभीर आरोप केले आणि थेट सीबीआयच्या आरोपपत्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

सादर केलेले जबाब बनावट, विधीचा दावा

विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्या न्यायालयात विधीने ठामपणे सांगितले की, तपास यंत्रणांनी तिच्या नावाने जो जबाब सादर केला आहे, तो पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिला अनेक कोरे कागद आणि ईमेलच्या प्रतींवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्या कागदपत्रांचा वापर करून तिचा बनावट जबाब तयार करण्यात आला.

आईविरुद्ध खोटे आरोप लावण्यासाठी दबाव!

विधी मुखर्जी हिने न्यायालयात आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, तिच्यावर आई इंद्राणी मुखर्जीविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. इतकेच नाही, तर तिने दावा केला की, तिच्या आईच्या अटकेनंतर तिचे वडिलोपार्जित दागिने आणि बँकेत जमा असलेले ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम चोरीला गेली, आणि या सर्वामागे राहुल मुखर्जी (पीटर मुखर्जी यांचा मुलगा) आणि रॉबिन मुखर्जी असल्याचा आरोप केला.

राहुल आणि रॉबिननेच पैसे चोरून आईला फसवलं!

विधीच्या मते, राहुल आणि रॉबिन यांना आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे त्यांनी हा कट रचला. विधीच्या म्हणण्यानुसार, तिच्या नावावर नवीन बँक लॉकर उघडण्यात आला, आणि त्याचा गैरवापर करत दागिने व पैसे गायब करण्यात आले. या सर्व गोष्टींचा पर्दाफाश होऊ नये, म्हणून त्यांनी इंद्राणी मुखर्जीला खोट्या प्रकरणात अडकवले, असा तिचा थेट आरोप आहे.

विधी म्हणाली की, शीना बोरा नेहमी इंद्राणीची बहीण म्हणून स्वत:ची ओळख करून देत असे, पण प्रत्यक्षात त्या दोघी एकेमकींच्या खूप जवळच्या होत्या. राहुल आणि शीनामधील प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर घरात तणाव निर्माण झाला. तसंच, शीना ड्रग्ज घेत असल्याचेही कुटुंबाला कळले होते, असे विधीने सांगितले.

शीनाला कुणी मारलं?

शीना २०११ मध्ये गोव्यातील एका लग्न समारंभात शेवटची दिसली होती, तर २०१३ पर्यंत ती ईमेलवर संपर्कात होती, असंही साक्षीमध्ये नमूद करण्यात आलं. सरकारी वकिलांच्या मते, एप्रिल २०१२ मध्ये इंद्राणीने आपल्या माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्या मदतीने शीना बोऱ्याची हत्या केली, आणि मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळला.

या प्रकरणाचा उलगडा २०१५ मध्ये श्यामवर राय याच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटकेनंतर झाला. त्याने केलेल्या कबुलीजबाबातून ही संपूर्ण केस उघडकीस आली.

प्रकरणाला नवे वळण

मात्र आता विधी मुखर्जीच्या कोर्टातील खळबळजनक साक्षीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तिच्या मते, सध्याचे आरोपपत्र हे बनावट पुराव्यांवर आधारित असून, इंद्राणी मुखर्जी निर्दोष आहे.

Web Title: Big twist in Sheena Bora murder case after 13 years! What did Indrani Mukerjea's daughter say that changed the direction of the case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.