मुंबई - राजस्थानच्या अजमेर येथील बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरार दहशतवादी डॉ.मोहम्मद जलीस शफी उल्ला अन्सारीला (६८) महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून ताब्यात घेतले आहे. हा फरार आरोपी पॅरोलवर असताना फरार झाला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथीस मोमीन पाडाच्या बीआयटी चाळीत तो कुटुंबियांसोबत रहात होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.कुख्यात दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला कानपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब म्हणून देखील ओळखतात. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. त्यामुळे तो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरारनुकताच ६८ वर्षीय जलील २१ दिवसांचा पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात १०.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान हजेरी लावण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र, १६ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले.