mumbai serial blast convict terrorist jalees ansari missing | मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरार

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरार

ठळक मुद्दे1993मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो 21 दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे.

मुंबई- 1993मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटा(Mumbai serial blast)तील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी (Terrorist Jalees Ansari) गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो 21 दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे. तसेच दहशतवादी जलीस अन्सारीला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देणारा दहशतवादी जलीस अन्सारी सापडत नाहीये. जलीसवर 50 हून अधिक साखळी बॉम्बस्फोटांचा आरोप आहे. शुक्रवारी दहशतवादी जलीस अन्सारीच्या पॅरोलची मुदत संपणार होती. आज जलीसला अजमेर तुरुंगात पोहोचायचं होतं. परंतु गुरुवारी सकाळपासूनच तो गायब झाला आहे.

दहशतवादी जलीस अन्सारीला अजमेर बॉम्बस्फोटात दोषी ठरवण्यात आलं असून, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दहशतवादी जलीस अन्सारी हा इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी या दहशतवादी संघटनांशी जोडलेला होता. पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्याचं त्यानं प्रशिक्षण घेतलं होतं. अन्सारी जयपूर बॉम्बस्फोट, अजमेर बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील दोषी आहे. 

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काल दुपारी अन्सारीचा मुलगा जैद हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्यानं जलीस अन्सारी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. जैदनं सांगितलं की, वडील नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत. जैदच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँच त्याला पकडण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. 

Web Title: mumbai serial blast convict terrorist jalees ansari missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.