Bhiwandi woman gang-raped at gunpoint; 4 arrested, 1 absconding | शस्त्राचा धाक दाखवत भिवंडीत महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ जणांना अटक तर एक जण फरार

शस्त्राचा धाक दाखवत भिवंडीत महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ जणांना अटक तर एक जण फरार

भिवंडी - महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतांनाच तालुक्यातील गोदाम पट्ट्यात असलेल्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन शेजारील पायवाटेने रात्री आपल्या मैत्रिणीकडे कामाची चौकशी करून घरी परतणाऱ्या 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून महिलेस जखमी करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करताच अवघ्या काही तासांतच नारपोली पोलिसांनी यातील चार नराधमांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. या फरार आरोपीचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. 

भिवंडी शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला असून तेथे मजुरी कामासाठी हजारो स्त्री पुरुष येत असतात लॉक डाऊन काळात काम नसल्याने नव्या कामाच्या शोधत एक 42 वर्षीय महिला चरणीपाडा परिसरात आपल्या मैत्रीणीकडे नव्या कामाच्या चौकशी साठी सायंकाळी गेली असता तेथून रात्री उशिरा ती एकटीच राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन शेजारील मुनिसुरत कंपाऊंड येथील झाडाझुडपाच्या आडवाटेने आपल्या घरी जात असताना रस्त्यात मद्यपी पाच युवकांच्या टोळक्याने महिलेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केले .अत्याचारग्रस्त महिला बेशुद्धावस्थेत त्याच ठिकाणी पडून होती .दुसऱ्या दिवशी या महिलेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर पोलिसांनी अज्ञात अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करीत जखमी महिलेस ठाणे येथील कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

दरम्यान या अत्याचाराची नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासातच या घटनेतील नराधम आरोपी माँटी कैलास वरटे ( वय 25 वर्षे ) विशाल कैलास वरटे ( वय 23 वर्ष दोघे राहणार भिवंडी ), कुमार डाकू राठोड ( वय 25 वर्ष रा.पुर्णा ) अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता ( वय 28 वर्ष ) यांना ताब्यात घेऊन नारपोली पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 376(ड), 341, 324, 323 प्रमाणे अटक केली असून त्यांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Web Title: Bhiwandi woman gang-raped at gunpoint; 4 arrested, 1 absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.