Bhiwandi MIM district president arrested for ransom | भिवंडीत एमआयएमच्या जिल्हा अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक 

भिवंडीत एमआयएमच्या जिल्हा अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक 

भिवंडी : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून भिवंडी एमआयएमच्या जिल्हा अध्यक्ष  खालिद उर्फ गुड्डू शेखसह चार साथीदारांना एका बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी स्वीकारताना  रंगेहात अटक केल्याची घटना  शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. या घटनेमुळे  भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ  उडाली  असून  खालिद  गुड्डू  याच्यासह  त्याचे साथीदार  इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान  यांनाही  पोलिसांनी  अटक  केली  आहे. 

भिवंडी शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडे काही दिवसापूर्वी तक्रारदार खालिद गुड्डू व त्याच्या  साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने  स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी खालीद  गुड्डू याचे भिवंडी येथील बंगल्यात व समोर रात्रीच्या सुमाराला सापळा रचला होता. त्यावेळी आरोपी खालीद व त्याचे साथीदार  इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांना तक्रारदार यांचेकडून एक लाख रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

याप्रकरणी भिवंडी शहर पोलीसठाण्यात भादंवि कलम 364 अ, 386, 387, 34 आर्म कायदा 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक क्र.1 हे करीत आहेत. तर आरोपीच्या ताब्यातून  एक लाख  पंचवीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, खालिद गुड्डू याने राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन गेल्याच  विधानसभा निवडणुकीला भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्यावतीने  निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता.  

 

Web Title: Bhiwandi MIM district president arrested for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.