Bhopal Crime: मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 'मैत्री'च्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस मुख्यालयात विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस उपअधीक्षक कल्पना रघुवंशी हिने आपल्या जिवलग मैत्रिणीच्या घरातून चक्क २ लाख रुपये रोख आणि मोबाईल फोनची चोरी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. यानंतर पोलिसांनी महिला डीएसपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
जहांगीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महालक्ष्मी परिसरात प्रमिला तिवारी या आपल्या कुटुंबासोबत राहतात. पोलीस बटालियनमध्ये राहणाऱ्या डीएसपी कल्पना रघुवंशी यांच्यासोबत त्यांची गेल्या सहा वर्षांपासून ओळख होती. आठ महिन्यांपासून दोघींच्या घरी एकमेकींचे येणे-जाणे होते. प्रमिला यांनीच कल्पना यांच्या आईचे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड बनवून दिले होते, तेव्हा त्यांच्या ओळखीला सुरुवात झाली.
नेमके काय घडले?
प्रमिला यांच्या तक्रारीनुसार, २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वडिलांनी त्यांना मुलांच्या कोचिंग फीसाठी २ लाख रुपये रोख दिले होते. प्रमिला यांनी हे पैसे एका बॅगमध्ये ठेवून ती बॅग बाहेरच्या खोलीत ठेवली होती. सायंकाळी ६:३० च्या सुमारास, प्रमिला अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या आणि त्यांची मुलगी दुसऱ्या खोलीत होती. नेमकी याच वेळी डीएसपी कल्पना रघुवंशी, दार उघडे पाहून घरात शिरल्या. अवघ्या ४० सेकंदांत त्यांनी बॅगेतील रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरला आणि बाहेर पडल्या. अंघोळ करून परत आल्यावर प्रमिला यांना पैसे आणि मोबाईल जागेवर दिसले नाहीत.
सीसीटीव्हीने समोर आणलं सत्य
प्रमिला यांनी तत्काळ आपल्या फ्लॅटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. हे फुटेज पाहून त्यांना मोठा धक्का बसला. कारण, चोरी करताना खुद्द त्यांची मैत्रीण डीएसपी कल्पना रघुवंशी स्पष्टपणे दिसत होती. फुटेजमध्ये कल्पना रघुवंशी नोटा घेऊन बाहेर जाताना दिसत होती. प्रमिला यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी कल्पना रघुवंशी यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला.
डीएसपी फरार
गुन्हा दाखल झाल्यापासून डीएसपी कल्पना रघुवंशी फरार आहेत. दरम्यान, पोलीस मुख्यालयाने तातडीची कारवाई करत कल्पना रघुवंशी यांना निलंबित केले आहे. पोलिसांनी कल्पना यांच्या घरी छापा टाकला असता, प्रमिला यांचा चोरीला गेलेला मोबाईल फोन त्यांच्या घरातून जप्त करण्यात आला आहे, परंतु चोरी झालेले २ लाख रुपये मात्र अद्याप मिळालेले नाहीत. अविवाहित असलेल्या कल्पना रघुवंशी या गेल्या एक वर्षापासून वैद्यकीय रजेवर होत्या. त्या त्यांच्या आईसोबत सरकारी निवासस्थानात राहत होत्या. पोलीस सध्या फरार डीएसपीचा शोध घेत आहेत.
Web Summary : In Bhopal, a female DSP stole Rs 2 lakh and a phone from her friend's home. CCTV footage captured the theft. The DSP is now suspended and absconding after a police case was filed.
Web Summary : भोपाल में, एक महिला डीएसपी ने अपनी दोस्त के घर से 2 लाख रुपये और एक फोन चुरा लिया। चोरी सीसीटीवी में कैद हो गई। पुलिस मामला दर्ज होने के बाद डीएसपी निलंबित और फरार है।