"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:32 IST2024-12-11T19:32:04+5:302024-12-11T19:32:20+5:30
अतुलची आई विमानतळावर रडत असताना बेशुद्ध पडली. माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं गेलं. माझा म्हातारपणीचा आधार गेला असं म्हटलं आहे.

"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
बंगळुरूमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारा एआय इंजिनिअर अतुल सुभाष याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बुधवारी संध्याकाळी त्याचे आई-वडील आणि भाऊ त्याच्या अस्थी घेऊन पाटणा विमानतळावर पोहोचले. तिथे अतुलच्या पालकांनी आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. अतुलची आई विमानतळावर रडत असताना बेशुद्ध पडली. माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं गेलं. माझा म्हातारपणीचा आधार गेला असं म्हटलं आहे.
अतुल सुभाषचे वडील म्हणाले, "आपली न्याय व्यवस्था खूपच कमकुवत आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही. माझ्या मुलाने सर्वकाही सांगितलं आहे. त्याने आम्हाला फार काही सांगितलं नाही. हे सर्व ऐकून आम्ही दु:खी होऊ असं त्याला वाटलं. त्याचा खूप छळ झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था योग्य असावी अशी आमची इच्छा आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे.''
अतुलचा धाकटा भाऊ विकास म्हणाला, सोमवारी २.५० वाजता मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्या व्यक्तीने विचारलं की मी माझा मोठा भाऊ अतुल सुभाष याच्याशी बोललो आहे का? मी रविवारी त्याच्याशी बोललो असल्याचं सांगितलं. रात्री बोलताना तो अगदी नॉर्मल होता.
विकास पुढे सांगतो, मी हा फोन कॉल एक प्रँक मानला. पण जेव्हा मी माझे व्हॉट्सॲप चेक केले तेव्हा मला माझ्या भावाचे अनेक मेसेज आले होते. तासाभरापूर्वी त्याने चार ईमेलही पाठवले होते. त्यात काही लोकांची नावं आणि संपर्कही देण्यात आले होते. मात्र, असं असूनही माझं व्हॉट्सॲप हॅक झालं असावं, असं मला वाटलं. यानंतर मी कॉलरला पुन्हा फोन केला तेव्हा मला कळालं की, तो सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन या पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओशी संबंधित आहे.
यानंतर एनजीओने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घरापर्यंत पोहोचले, पण दरवाजा तोडला नाही, कारण त्यांना वाटलं की, कदाचित अतुल घरी नसेल, कारण त्याची गाडी पार्किंगमध्ये नव्हती. पोलिसांनी सांगितलं की भावासोबत काहीतरी घटना घडली आहे. काही तासांनंतर जेव्हा विकास बंगळुरूला पोहोचला तेव्हा भावाने आत्महत्या केल्याचं आढळलं. घरात गेल्यावर भावाचा मृतदेह लटकलेला दिसला.
आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाषने २४ पानांची सुसाईड नोट आणि सुमारे १.५ तासांचा व्हिडीओ त्यांच्या लहान भावाच्या व्हॉट्सॲप नंबर आणि एका एनजीओच्या ग्रुपवर शेअर केला होता. न्याय मिळावा, असं लिहिलं होतं. तसं न झाल्यास त्याचे अस्थी न्यायालयासमोरील गटारात फेकून द्यावे. जेणेकरून त्याच्या आत्म्यालाही या व्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही असं सतत वाटत राहिल असंही म्हटलं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अतुलने आपली सुसाईड नोट अनेकांना ईमेलद्वारे पाठवली होती.