OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:46 IST2025-10-20T16:46:09+5:302025-10-20T16:46:54+5:30
अरविंदच्या भावाने ओला कंपनीचे मालक भावेश अग्रवालसह काही लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भावेश अग्रवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
बंगळुरू - देशातील नावाजलेली OLA इलेक्ट्रिक कंपनीतील ३८ वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने २८ पानी सुसाइड नोट लिहिली आहे. ज्यात कंपनीचे मालक भावेश अग्रवालसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमधून केला आहे. मृत कर्मचाऱ्याचे नाव अरविंद असं आहे. कंपनीकडे त्यांच्याबाबतीत कुठलीही तक्रार किंवा समस्या आली नव्हती असा कंपनीचा दावा आहे.
माहितीनुसार, अरविंद होमोलॉगेशन इंजिनिअर होते आणि २०२२ पासून ओला कंपनीत काम करत होते. २८ सप्टेंबरला अरविंद यांनी विष पिऊन आत्महत्या केली. अरविंद बंगळुरूतील चिक्कलसंद्रा येथे राहणारे होते. विष प्यायल्यानंतर अरविंदला तडफडताना पाहून सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु उपचारावेळी अरविंद यांनी जीव सोडला. अरविंदच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाला २८ पानी सुसाइड नोट सापडली. ज्यात त्यांनी सुब्रत कुमार दास आणि भावेश अग्रवाल यांच्यावर दबाव टाकणे आणि मानसिक छळ करण्याचा आरोप लावला होता. अरविंदला कंपनीत त्रास दिला जायचा, त्याला सॅलरीही देण्यास कंपनीने नकार दिला होता.
या प्रकरणी अरविंदच्या भावाने कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदच्या मृत्यूनंतर २ दिवसांनी त्याच्या खात्यात १७ लाख ४६ हजार ३१३ रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. या पैशाबद्दल अरविंदच्या भावाने कंपनीकडे विचारणा केली तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अरविंदच्या भावाने ओला कंपनीचे मालक भावेश अग्रवालसह काही लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भावेश अग्रवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
ओला कंपनीने काय म्हटलं?
अरविंदच्या मृत्यूनंतर ओला कंपनीने पत्रक जारी केले आहे. त्यात कंपनीने म्हटलं आहे की, आमचे कर्मचारी अरविंद यांच्या आकस्मिक मृत्यूने आम्हाला धक्का बसला आहे. या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबासोबत आहोत. अरविंद मागील साडे तीन वर्षापासून कंपनीसोबत काम करत होते. ते बंगळुरू येथील मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही कुठलीही तक्रार अथवा समस्या मांडली नाही. मात्र कंपनीचे मालक आणि इतर अधिकाऱ्यांवर झालेल्या FIR ला आम्ही कर्नाटक हायकोर्टात आव्हान देऊ असं कंपनीने म्हटलं आहे.