ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:09 IST2025-08-26T16:08:44+5:302025-08-26T16:09:28+5:30
कमाई सुरू झाल्यानंतर निक्कीने तिचा पती विपिनलाही पैसे देणे सुरू केले. हे पैसे विपिन व्यसन आणि मुलींवर उडवत होता.

ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
ग्रेटर नोएडा - निक्की पायला हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात तिच्या मृत्यूचं खरे कारण सासरच्यांचे रुढीवादी विचारसरणी आणि संकुचित मानसिकता असल्याचे सांगितले जाते. लग्नानंतर ६ वर्षापर्यंत निक्कीने तिचे शिक्षण आणि कौशल्य दडपून ठेवले. संसारासाठी पती, सासू, सासरे यांची सेवा केली. कधीतरी त्यांच्या मनातील भावना बदलतील. सून न मानता मुलगी म्हणून त्याच प्रेमाने, स्नेहाने तिला जगता येईल अशी अपेक्षा तिला होती.
सासरच्यांच्या विचारात कुठलेही बदल झाले नाहीत. ३ वर्षाआधी पती विपिनच्या चारित्र्याबाबत निक्कीच्या कानावर पडले. निक्कीचा मुलगा ५ वर्षाचा झाला होता. वडिलांच्या चारित्र्याचा परिणाम मुलावर होऊ नये असे तिला वाटत होते. त्याच विचाराने ३ वर्षापूर्वी तिने पतीच्या कृत्यांना विरोध सुरू केला. यातूनच जोडप्यांमध्ये वाद सुरू झाला. निक्कीने अखेरच्या श्वासापर्यंत तिचा छळ सुरूच राहिला.
किती शिक्षण झाले होते?
निक्की आणि तिची बहीण कांचन यांचे बीएपर्यंत शिक्षण झाले होते. लग्नानंतर दोन्ही मुलींना स्वावलंबी व्हायचे होते त्यासाठी त्यांनी ब्यूटीशियनचा कोर्सही केला होता. एकाच घरात सून म्हणून दोघी गेल्या. निक्कीचे लग्न विपिन आणि कांचनचा पती रोहित दोघेही वडिलांच्या पैशावर जगत होते. दोन्ही बहिणींना देण्यासाठी पतीसाठी पैसेही नव्हते. बेरोजगार पतीवर ओझं होऊ नये म्हणून दोघींनी आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्यांनी घरातूनच ब्यूटी पार्लर सुरू केले. त्यांचे कौशल्य कामाला आले. दोन्ही बहिणींचे काम वाढतच गेले. परिसरातील लग्न समारंभ आणि अन्य आयोजनात महिला ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढल्या.
दरम्यान, कमाई सुरू झाल्यानंतर निक्कीने तिचा पती विपिनलाही पैसे देणे सुरू केले. हे पैसे विपिन व्यसन आणि मुलींवर उडवत होता. ३ वर्षाआधी विपिनचे कृत्य निक्कीसमोर आले तेव्हा तिने त्याला पैसे देणे बंद केले. त्यानंतर नशेच्या धुंदीत विपिन निक्कीला कायम मारहाण करत होता. निक्कीने मात्र तिची प्रगती सुरूच ठेवली होती. सोशल मीडियाचा सदुपयोग करत तिने तिचा व्यवसाय वाढवला होता. निक्कीचे इन्स्टाग्रामवर ६४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यावरूनही विपिनने तिला मारहाण केली आहे. आता निक्कीच्या घरच्यांनी विपिन आणि त्याच्या कुटुंबावर ३५ लाखांची हुंडा मागणी केल्याचा आरोप आहे.