अंधश्रद्धेतून दीड महिना सुरू होती मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 06:05 IST2020-07-28T06:05:17+5:302020-07-28T06:05:35+5:30
कल्याणमधील मायलेकाचं मृत्यूप्रकरण : जीवदानी, दत्त अंगात आलेल्याकडून घडले हत्याकांड

अंधश्रद्धेतून दीड महिना सुरू होती मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कविता तरे (२७) हिच्या अंगात जीवदानीदेवी, विनायक तरे (२२) याच्या अंगात काळभैरव आणि एका अल्पवयीन मुलाच्या अंगात दत्त आल्यावर ते गेला दीड महिना पंढरीनाथ शिवराम तरे (५०) आणि चंदूबाई शिवराम तरे (७६) या मायलेकाच्या अंगातील भूत उतरवण्याकरिता त्यांना अंगावर हळद टाकून मारहाण करीत होते आणि आजूबाजूचे कुणीही त्यांना या मारहाणीतून वाचविण्याकरिता ना पोलिसांकडे गेले ना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे गेले. सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या शहरातील घोर अंधश्रद्धेतून घडलेल्या हत्याकांडाची ही लाजिरवाणी कहाणी आता उघड झाली आहे.
पोलिसांच्या ताब्यात असलेले तिघे आरोपी अजून आपण काळभैरव, दत्त आणि जीवदानीदेवी असल्याचे समजत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजूनही हे तिघे जण आपण देवांचे अवतार असल्याच्या भ्रमात आहेत. आपण ज्यांना बेदम मारले, ते त्यांच्या शरीरातील भूत निघून गेल्याने निपचित पडले असून कधीही उठून उभे राहतील, अशी भाकडकथा चौकशीत पोलिसांना सांगत आहेत. अंगातील भूत तंत्रमंत्र करून बाहेर निघेल, या अंधश्रद्धेपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथील पश्चिमेकडील अटाळीत शनिवारी घडली. या घटनेने समाजातील संवेदनशील व्यक्ती व पोलीस यांना धक्का बसला.
या प्रकरणी पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक तरे, कविता तरे यांच्यासह मांत्रिक सुरेंद्र पाटील याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे हिच्या अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याने पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगीता ही कविताला अटाळी गावात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेऊन जात असत. मांत्रिक पाटील याने त्यांना पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदूबाई या दोघांच्या अंगात भूत आहे व त्यांच्या अंगातील भूत तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर, कविताच्या अंगात जीवदानीदेवी, विनायकच्या अंगात काळभैरव आणि घरातील एका अल्पवयीन मुलाच्या अंगात दत्त संचारले. या तिघांनी मायलेकाची हत्या केल्याने सध्या कोठडीची हवा खात आहेत. त्या तिघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.
च्पोलिसांच्या चौकशीतही हे तिघे आपण देव असल्याचे ठामपणे सांगत असून पंढरीनाथ आणि चंदूबाई यांची हत्या झालेली नसून त्यांच्या अंगातील भूत मारहाणीमुळे पळून गेल्याचे ते सांगत आहेत. वरकरणी हे प्रकरण अंधश्रद्धेचे भासविले जात असले, तरी प्रत्यक्षात मालमत्तेच्या वादातून तर घडलेले नाही ना, असे पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, तरे यांच्या घरात एकत्र कुटुंबपद्धती असून आर्थिक परिस्थिती फार चांगली किंवा खूप हलाखीची नाही.
च्एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दुहेरी हत्याकांड कोणत्या आर्थिक वादातून घडले ते आतापर्यंतच्या तपासातून उघड झालेले नाही. ज्यांच्या बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला, त्या तिघांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यामुळे हे तिघे इतके पराकोटीचे अंधश्रद्धाळू असण्याइतके अल्पशिक्षित नाहीत. आतापर्यंत अंधश्रद्धेच्या घडलेल्या घटनांमध्ये मांत्रिकाने स्वत:च्या आर्थिक लोभापायी भक्तांना आमिष दाखवून फसविल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात तसे काही दिसून येत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे.