दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 17:42 IST2019-05-18T17:21:14+5:302019-05-18T17:42:35+5:30
पिंपरीत दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाला मारहाण
पिंपरी : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास जुनी सांगवीतील पवनानगर येथे घडली.
सिद्धांत निकाळजे (रा. पवनानगर, जुनी सांगवी), राजकिरण घुटे (रा. जयमालानगर, जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय १८, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धर्माधिकारी हे गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घरी जात असताना जुनी सांगवीतील करण जयमाला बिल्डिंगजवळ निकाळजे याने धर्माधिकारी यांच्या दुचाकीला कट मारला. फिर्यादींनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत वाद घातला. तसेच चावी तोंडावर मारुन जखमी केले. यासह राजकिरण घुटे याने धर्माधिकारी यांच्या कानाखाली मारुन दोघेही तेथून पसार झाले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.