सोन्यासाठी २.५० लाखाच्या बेसबँडची चोरी; ‘५जी’ चा जीव काढणाऱ्या टोळीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:25 IST2025-07-12T06:25:43+5:302025-07-12T06:25:43+5:30
मोबाइलमध्ये ५ जी नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. यावरून जिओच्या अधिकाऱ्यांनी नेटवर्क टॉवरच्या पाहणीत १२ ठिकाणचे बेसबँड चोरीला गेल्याचे उघड झाले.

सोन्यासाठी २.५० लाखाच्या बेसबँडची चोरी; ‘५जी’ चा जीव काढणाऱ्या टोळीला बेड्या
नवी मुंबई : जिओच्या ५जी नेटवर्कसाठी वापरले जाणारे बेसबँड चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बेसबँडच्या मदरबोर्डमधील सोन्याच्या ‘इंटिग्रेटेड सर्किट’साठी त्यांनी १२ डिव्हाईस चोरले होते. त्यांनी एका बेसबँडमधील सुमारे १५ हजारांच्या सोन्यासाठी अडीच लाखांचा बेसबँड चोरी करून जिओच्या ५ जी नेटवर्कचा बँड वाजवला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
तळोजा, खांदेश्वर, पनवेल शहर परिसरात जून महिन्याच्या अखेरीस जिओच्या ५ जी नेटवर्कचा ‘जीव’ निघाला होता. मोबाइलमध्ये ५ जी नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. यावरून जिओच्या अधिकाऱ्यांनी नेटवर्क टॉवरच्या पाहणीत १२ ठिकाणचे बेसबँड चोरीला गेल्याचे उघड झाले. यासंदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखा सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी मध्यवर्ती कक्षाचे निरीक्षक सुनील शिंदे यांच्याकडे तपास सोपवला होता. यासाठी सहायक निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, महेश जाधव, सचिन कोकरे, सतीश भोसले, हवालदार संजय राणे, अनिल यादव, महेश ठाकूर, नितीन जगताप यांची पथके केली होती. त्यांनी तांत्रिक तपासातून संशयित कारची माहिती मिळविली होती. या कारचा रातोरात मागोवा घेत पथकाने नाशिक, मालेगाव व सातारा येथून चौघांना अटक केली. मधुकर गायकवाड (२९), अभिषेक काकडे (२४), सौरभ मंजुळे (२४) व दानिश मलिक (२२) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी मूळच्या परभणीच्या मधुकरने यापूर्वी इंडस कंपनीमार्फत जिओचे ५ जी बेसबँड बसविण्याचे काम केले होते. त्यामुळे त्याला सोन्याच्या चिपची माहिती होती. यावरून त्याने अभिषेकच्या मदतीने व सौरभच्या गाड्यांमधून बेसबँड चोरून मालेगावच्या दानिशला विकले.
चिपमध्ये सोन्याचा वापर
जिओच्या ५ जी बेसबँडमधील इंटिग्रेटेड सर्किटला गंज लागू नये यासाठी त्यामध्ये सोन्याचा वापर केला आहे. त्यानुसार प्रत्येक बेसबँडमध्ये १.३ ग्रॅम सोन्याचा वापर झालेला आहे. या १५ हजारांच्या सोन्यासाठी टोळीकडून चक्क २ लाख ६० हजारांचा डिव्हाईसच चोरला जात होता. दरम्यान अटक करण्यात आलेल्या मधुकरने यापूर्वीही असे गुन्हे केले असून त्याच्यावर परभणी, पुणे येथे तीन गुन्हे दाखल आहेत.