Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 10:46 IST2025-09-13T10:46:01+5:302025-09-13T10:46:51+5:30
Rohit Godara And Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अमेरिकेत असलेला कुख्यात गँगस्टर रोहित गोदाराने व्हॉइस मेसेज पाठवून या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने दिशा पाटनीच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली.
कोण आहे रोहित गोदारा?
गँगस्टर रोहित गोदारा हा राजस्थानमधील बिकानेरमधील लूणकरण येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ३२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड आहे. गेल्या १३ वर्षांपासून रोहित गुन्हेगारीच्या जगात आहे. गुन्हेगारीच्या जगात येण्यापूर्वी तो मोबाईल मेकॅनिक होता.
बनावट पासपोर्टद्वारे दिल्लीहून दुबईला गेला पळून
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित गोदाराने राजस्थानमधील व्यावसायिकांकडून ५ कोटी ते १७ कोटी रुपयांपर्यंत खंडणी मागितली आहे. त्याच्यावर सिकरमध्ये गँगस्टर राजू ठेहटची हत्या केल्याचाही आरोप आहे. सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही रोहित गोदाराचं नाव पुढे आलं होतं. रोहित गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगसाठी काम करतो. २०२२ मध्ये रोहित बनावट पासपोर्टद्वारे दिल्लीहून दुबईला पळून गेला.
पाठवला व्हॉइस मेसेज
रोहितने बनावट पासपोर्टमध्ये आपलं नाव पवन कुमार असं लिहिलं होतं. आता रोहित गोदाराने स्वतः व्हॉइस मेसेज पाठवून या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये रोहितने स्पष्ट केलं की, त्याचा आवाज खरा आहे आणि लॉरेन्स अनमोल बिश्नोईशी त्याचा कोणताही संबंध नाही. यापूर्वीही सोशल मीडियावर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
संत प्रेमानंद महाराजांच्या अपमानाचा बदला
सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, संत प्रेमानंद महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने काही दिवसांपूर्वी संत प्रेमानंद महाराजांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला.