लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट चेकद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि मुंबईच्या कंपनीला २०.७६ लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अभियंता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.अजय दशरथ आसुटकर (३२) रा. वडगाव रोड, चंद्रपूर आणि महेश एकनाथ धकिते (३५) रा खापा, नरखेड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार नितीन नारायण निखारे, रेशीमबाग हा फरार आहे. मुंबईतील स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि. कंपनीचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दादर शाखेत खाते आहे. २४ जानेवारीला अजय आसुटकरने बेसाच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियात स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि. कंपनीचा बनावट चेक जमा केला. बँकेने या चेकवर २०.७६ लाखाची रक्कम दिली. ही रक्कम अजय आसुटकरच्या हायटेक पॉवर इंजिनिअरिंगमध्ये जमा झाली. अजय अभियंता आहे. तो सोलर पॉवरची शाखा चालवितो. त्याच्या खात्यातून रक्कम महेश धकिते आणि नितीन निखारेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. ही रक्कम आरोपींनी खात्यातून काढूनही घेतली. स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. ली. कंपनीच्या खात्यातून २०.७६ लाखाची रक्कम काढण्यात आल्यामुळे बँकेच्या संचालकांनी बँकेशी संपर्क साधला. त्यांनी बँकेने कुणालाच या रकमेचा चेक दिला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बेसा शाखेला खरी माहिती समजली. व्यवस्थापक प्रीती पाटील यांनी बेलतरोडी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. अजय आसुटकर आणि महेश धकितेने नितीन निखारेने चेक दिल्याचे सांगितले. नितीनने त्यांना या कामासाठी दोन-दोन लाखाचे चेक दिले होते. त्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. महेश धकिते आणि नितीन निखारे प्रॉपर्टीच्या व्यवसायात दलालीचे काम करतात. नितीन निखारे हाती लागल्यानंतर यातील खरी माहिती उजेडात येणार आहे. त्याने ज्या पद्धतीने बनावट चेकचा वापर केला, त्यावरून तो फसवणूक करण्यात पटाईत असल्याचे कळते. अजय आणि महेशला न्यायालयात हजर करून ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक दिलीप साळुंके करीत आहेत.
नागपुरात बनावट चेक देऊन बँकेला घातला २०.७६ लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:31 IST
बनावट चेकद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि मुंबईच्या कंपनीला २०.७६ लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अभियंता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
नागपुरात बनावट चेक देऊन बँकेला घातला २०.७६ लाखाचा गंडा
ठळक मुद्देअभियंत्यासह दोघांना अटक : रॅकेट सक्रिय असल्याची शंका