सांगलीत बडोदा बँकेची १७ कोटीला फसवणूक; खासगी कंपनीचा व्यवस्थापक जेरबंद
By शीतल पाटील | Updated: August 30, 2022 22:33 IST2022-08-30T22:33:16+5:302022-08-30T22:33:52+5:30
याबाबत माहिती अशी की, मुंबई येथील सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीचे मिरज - तासगाव रोडवर कोल्ड स्टोअरेज होते.

सांगलीत बडोदा बँकेची १७ कोटीला फसवणूक; खासगी कंपनीचा व्यवस्थापक जेरबंद
सांगली : मिरजेतील बँक ऑफ बडोदाची १६ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षानंतर सीएनएक्स (कमोडिटी नेक्स्ट) कार्पोरेशन लि. मुंबईचा एरिया व्यवस्थापक अजित नारायण जाधव याला अटक केली. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, मुंबई येथील सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीचे मिरज - तासगाव रोडवर कोल्ड स्टोअरेज होते. या कोल्डस्टोअरेजमध्ये बेदाणा, हळदीचा साठा करण्यात आला होता. हा शेतीमाल बडोदा बँकेकडे तारण ठेवून शेतकऱ्यांच्या नावे १६ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्याशिवाय शेतीमालाची विक्री न करण्याचा करारही कंपनीने बँकेशी केला होता. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान कोल्ड स्टोअरेजमधील शेतीमाल बँकेच्या परवानगीविनाच परस्पर विकण्यात आला. तारण ठेवलेल्या बेदाण्याची विक्री करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे, बँक ऑफ बडोदाकडून मुंबईच्या सीएनएक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह एरिया व्यवस्थापक आणि काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून एरिया व्यवस्थापक अजित नारायण जाधव याचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी त्याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक निरीक्षक युवराज सरनोबत, हवालदार अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, विनोद कदम, दीपक रणखांबे यांनी भाग घेतला.