Bangladeshi Transgender: बांगलादेशातल्या हिंसाचारानंतर भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. देशभरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींना शोधून त्यांना परत पाठवले जात आहे. अशातच दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला. दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच तृतीयपंथीला अटक केली आहे, ज्याला भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याच्या आरोपाखाली ४५ दिवसांपूर्वी बांगलादेशला पाठवण्यात आलं होतं. हा तृतीयपंथी पुन्हा दिल्लीत आला त्याच भागात राहू लागला. पोलिसांनी त्याच्यासोबत बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या आणखी ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिसांच्या पथकाने अशोक विहार येथून १८ आणि शालीमार बागेतून सात बांगलादेशींना अटक केली. यामध्ये पाच तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी यातील एका तृतीयपंथीयाला हद्दपार केलं होतं. मात्र तो पुन्हा बेकायदेशीरपणे भारतात आला आणि दिल्लीत राहू लागला. अटक केलेल्या बांगलादेशींकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. हे बांगलादेशी मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या आयएमओ अॅपचा वापर करून बांगलादेशात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी बोलत होते.
उत्तर पश्चिम जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त भीष्म सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी शालीमार बाग परिसरात एक विशेष मोहीम राबवली. पथकाने मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, निवासी क्षेत्रे आणि वाहतूक चौकांवर शोध मोहीम राबवली. या दरम्यान, पाच तृतीयपंथी विविध ठिकाणी भीक मागताना सापडले. चौकशीत ते भारतीय नसल्याचे समोर आलं. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान ते सर्व बांगलादेशचे रहिवासी असल्याचे समोर आलं. अटक केलेल्या तृतीयपंथीयापैकी एक सुहान खान याला १५ मे २०२५ रोजी पोलिसांनी भारतातून हद्दपार केले होते.
सोमवारी आझादपूर मंडीजवळ पोलिसांच्या छाप्यात तृतीयपंथी सुहान खानला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की तो दिल्लीच्या निहाल विहार परिसरात राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी भारतात परतला होता. दोघेही एकत्र राहत होते. ४५ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी त्याला भीक मागाताना पकडून बांगलादेशला पाठवलं होतं. मात्र त पुन्हा दिल्लीत आला आणि भीक मागू लागला. पोलिसांनी त्याला पुन्हा पकडल्यानंतर त्यांना धक्का बसला.
हद्दपार केल्यानंतर सुहान खान बांगलादेशातील त्याच्या घरी गेलाच नाही. तो काही दिवस आगरतळा येथील अखौरा चेक पोस्टजवळील छावण्यांमध्ये राहिला आणि नंतर कसा तरी पुन्हा सीमा ओलांडून भारतात आला. त्यानंतर तो ट्रेनने दिल्लीला पोहोचला आणि निहाल विहारमध्ये राहू लागला. त्याला हद्दपार केल्यानंतर काहीस दिवसात तो परत आला. दरम्यान, सुहान खान हा बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्यातील रहिवासी असून १० वर्षांपूर्वी तो पश्चिम बंगालमधून बेकायदेशीरपणे भारतात आला होता. सुरुवातीला तो दिल्लीत रोजंदारी कामगार म्हणून काम करत होता आणि नंतर ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागू लागला.