बहराइच हिंसाचार; आरोपी सरफराजला फाशीची शिक्षा, तर इतर 9 आरोपींना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:19 IST2025-12-11T18:19:21+5:302025-12-11T18:19:56+5:30
Bahraich Violence : गेल्यावर्षी दुर्गा प्रतिमा विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान भडकलेल्या हिंसाचारात राम गोपाल मिश्राची हत्या झाली होती.

बहराइच हिंसाचार; आरोपी सरफराजला फाशीची शिक्षा, तर इतर 9 आरोपींना जन्मठेप
Bahraich Violence : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुर्गा प्रतिमा विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या धार्मिक हिंसाचारात 22 वर्षीय राम गोपाल मिश्रा याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा निकाल आज समोर आला असून, बहराइच अपर सत्र न्यायालयाने आरोपी सरफराजला फाशीची शिक्षा ठोठावली आहे, तर इतर 9 दोषींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
13 पैकी तिघांची निर्दोष मुक्तता
9 डिसेंबर रोजी न्यायालयाने 13 आरोपींपैकी 10 जणांना दोषी ठरवले होते. तर, पुराव्याअभावी तीन जणांना निर्दोष मुक्त केले. दोषींमध्ये अब्दुल हमीद, त्याचा मुलगा फहीम, सरफराज, तालिब, सैफ, जावेद, जीशान, ननकऊ, शोएब आणि मारुफ यांचा समावेश आहे. यापैकी सरफराजला मृत्युदंड देण्यात आला आहे. आरोपींवर BNS कलम 103(2) (मॉब लिंचिंगमध्ये हत्या), कलम 191(2), 191(3), 190, 109(2), 249, 61(2) तसेच आर्म्स अॅक्ट कलम 30 लागू करण्यात आली होती.
नेमकी घटना काय?
ही घटना महसी थाना क्षेत्रातील महराजगंज गावात घडली. मिरवणुकीत डीजेवर वाजणाऱ्या गाण्यावरुन वाद सुरू झाला. त्यानंतर दगडफेक आणि गोळीबार झाला. गोळी लागून राम गोपाल मिश्रा याचा मृत्यू झाला. पोलिसांनी 11 जानेवारी 2025 रोजी चार्जशीट दाखल केली आणि 418 फेब्रुवारीला आरोप निश्चित करण्यात आले. 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर 21 नोव्हेंबरला निकाल राखीव ठेवण्यात आला होता.